मुंबई : मुंबईत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे आणि तो का याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याचे मत व्यक्त करून गोरेगाववासियांनी मागील अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव तसेच आसपासच्या परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीने लक्ष द्यावे व योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
गेले अनेक दिवस संपूर्ण मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. अनेक भागात सातत्याने ‘वाईट’ हवा नोंदली जात आहे. काही ठराविक परिसर सोडल्यास इतर भागातही हीच परिस्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यात प्रामुख्याने गोरेगावमधील गोकुळधाम, साईबाबा कॉम्प्लेक्स, एनएनपी आणि मालाड पूर्व येथे नागरिकांना दूषित हवेला तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर आरे परिसरातही काहीशी हीच परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या आरेच्या आतील भागात रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले जात आहे. त्यामुळे तेथे धुळीचे प्रचंड लोट पसरलेले असतात. सकाळपासून या परिसरात दृष्यमानता कमी असते. रस्त्यावरुन जाता येता इतक्या दिवसांत शुद्ध हवा अनुभवता आली नसल्याचा दावा तेथील नागरिकांनी केला आहे. हवेत धुळीचे प्रमाण जास्त आणि प्राणवायू कमी प्रमाणात अशी स्थिती असल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील हवा प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता. त्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी गोरेगावमधील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. त्याचबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यावरही निर्बंध आणावेत, त्याशिवाय आम्ही शुद्ध हवा घेऊ शकत नाही असेही म्हटले आहे.
हेही वाचा…हाजीअली येथील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये आग, दोन दिवसांत आगीच्या तीन घटना
दरम्यान, गेले अनेक दिवस मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच आहे. यंदा मुंबईतील हवा गुणवत्तेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. नोव्हेंबर महिन्यापासून हवेचा दर्जा ‘वाईट’च आहे. त्यामुळे नागरिकांची शुद्ध हवेसाठी धडपड सुरू आहे. खालावलेल्या हवेमुळे श्वसन विकार, त्वचाविकार यांसारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. काळजी म्हणून नागरिक मुखपट्टीचा वापर करू लागले आहेत.