सोनिया गांधी यांची ग्वाही
देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माता आणि बाल आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी दुपारी ठाणे जिल्ह्य़ातील पालघर येथील कार्यक्रमात दिली. त्यांच्या हस्ते येथील स. तु. कदम विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला.
गेल्या सात वर्षांत आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी केंद्राने देशभरात ९० हजार कोटी रुपये खर्च केले. महाराष्ट्राने या योजना चांगल्या प्रकारे राबवून कुपोषणाचे प्रमाण कमी केले, असा उल्लेख करीत दोन वर्षांत देशातील विविध भागांमध्ये २७० नर्सिग स्कूलना मंजुरी देण्यात आली असून त्याचा लाभ घेऊन दुर्गम भागातील मुली आरोग्य सेवेत येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गेली आठ वर्षे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे चांगले परिणाम दिसून आले असून देश पोलिओ मुक्त झाला आहे. पल्स पोलिओ मोहिमेप्रमाणेच बालस्वास्थ्य कार्यक्रमही परिणामकारकपणे राबवावा, असे आवाहनही संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी केले.
 तब्बल १८ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री गुलाब नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, पालकमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री फौजिया खान, राजेंद्र गावित, खासदार बळीराम जाधव आदी उपस्थित होते.
राज्यातील जनतेला चांगल्या स्वरुपाच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून नव्या रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ सारख्या योजनांमुळे राज्यातील कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले असून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यात ११५० पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी त्यांच्या भाषणात दिली.
विद्यार्थ्यांसाठी सोनियाचा ‘दिनु’
डहाणू तसेच पालघर परिसरातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने सोनियाचा ‘दिनु’ ठरला. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ३५ आदिवासी विद्यार्थ्यांनी केले. व्यासपीठावरील प्रास्तविक, पाहुण्यांचे स्वागत, आभार प्रदर्शनही विद्यार्थ्यांनीच केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा