प्रभाकर देसाई यांना पुन्हा पाचारण करणार – डॉ. नरेश चंद्र

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांवरील अन्यायाबाबत राजर्षी शाहू महाराज शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांना दिले आहेत.
पेंढरकर महाविद्यालयाचे अनुदान बंद करून मान्यता रद्द करावी, अशी मागणी करणारे निवेदन संस्थेतील कर्मचाऱ्यांनी ८ जानेवारी रोजी संघटनेच्या माध्यमातून राज्यपालांना दिले होते. त्याची गंभीर दखल राज्यपालांनी घेतली असून, राज्यपालांचे अवर सचिव (शिक्षण) श्रीकृष्ण साळुंखे यांनी १७ जानेवारी रोजी कर्मचारी संघटनेचे निवेदन कुलगुरूंना पाठवून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी सांगितले की, पेंढरकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना मुंबई विद्यापीठाने चर्चेसाठी येण्याचे कळविले होते. त्यांना वेळ नसल्याने ते येऊ शकले नाहीत. आता त्यांना पुन्हा नोटीस पाठवून विद्यापीठात चर्चेसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठ आपली भूमिका स्पष्ट करील. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर महाविद्यालयात व्यवस्थापन, कर्मचारी यांच्यात सामंजस्य निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

न्यायासाठी धडपड सुरूच
महाविद्यालयातील २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी उपप्राचार्य किशोर फालक यांची भेट घेऊन, आपणांस न्याय देण्याची मागणी केली. यापूर्वी विश्वस्त डॉ. वेणीमाधव उपासनी यांची महाविद्यालयात भेट घेऊन व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या अन्यायाचा पाढा कर्मचाऱ्यांनी वाचला होता.

व्यवस्थापनाकडून खंडन
व्यवस्थापनावर होत असलेल्या विविध आरोपांचे खंडन संस्थेच्या विश्वस्तांनी केले आहे. तसे पत्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेस पाठविले असून त्यावर डॉ. वेणीमाधव उपासनी तथा स्वामी अच्युतानंद सरस्वती महाराज, डॉ. सुनित उपासनी, डॉ. यू. प्रभाकर राव, डॉ. प्रदीप व डॉ. प्रशांत राव आदी  विश्वस्तांच्या सह्य़ा असल्याचे सांगितले.