मुंबई : रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागाव्यात, यासाठी अभय योजना जाहीर करणाऱ्या शासनाने वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केलेल्या २३ योजनांमध्ये विकासक नियुक्तीस मान्यता दिली आहे. या वित्तीय संस्थांची सहविकासक म्हणून नोंद होणार आहे. मुंबईतील सुमारे १४१ योजना विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. या झोपु योजनांपैकी अनेक योजनांना विविध वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केले होते. मात्र या योजना ठप्प झाल्या होत्या. काही वर्षे भाडे मिळत नसल्यामुळे झोपडीवासीय हैराण झाले होते. अशा झोपु योजना पुनरुज्जीवित करण्यात वित्तीय संस्थांनी रस दाखविल्यानंतर राज्य शासनाने मे २०२२ मध्ये अभय योजना जारी केली. यानुसार वित्तीय संस्थांची सह-विकासक म्हणून नोंद करण्यास शासनाने मान्यता दिली.

वित्तीय संस्थांनी विकासक नियुक्त करुन या योजना पूर्ण कराव्यात, असे शासनाने सुचविले. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. अशा योजनांची छाननी करून मान्यता देण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली. या समितीने अशा योजनांमध्ये वित्तीय संस्थांना विकासक नियुक्तीस मान्यता दिली आहे. सुमारे १६ वित्तीय संस्थांनी ४७ योजनांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले होते. त्यापैकी २३ योजनांना मान्यता देण्यात आली असून सात योजना अमान्य करण्यात आल्या आहेत तर कागदपत्रे सादर न करणाऱ्या १७ झोपु योजना रद्द करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये नियुक्त झालेल्या विकासकांना पाच टक्के अधिमूल्य माफ करण्यात आले असून नियुक्तीसाठी झोपडीवासीयांच्या संमतीची अटही शिथील करण्यात आली आहे. मात्र झोपडीवासीयांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे आणि पुढील वर्षासाठी धनादेश देणे बंधनकारक आहे.

मान्यता मिळालेल्या योजना व नवे विकासक :

नित्यानंद नगर, वांद्रे रिक्लेमेशन (ओबेराय रिॲल्टी), महालक्ष्मी, लोअर परळ (ने. कश्यप बिल्डकॉन), जोगेश्वरी शिवदर्शन, मजास, मोगरा (आस्पेक्ट बिल्डकॉन), मातोश्री, भोईवाडा (मे. अल्परटॉन डेव्हलपर), दर्यासारंग मच्छिमार, माहीम (सांधी रिअल्टर्स), प्रेमनगर, विलेपार्ले पश्चिम व सर्वधर्मीय, जुहू गल्ली, अंधेरी पश्चिम (मे. शिव इन्फ्रा व्हिजन), पाली परेरावाडी, वांद्रे (जिवनाम डेव्हलपर), तीन मूर्ती व त्रिभूवन, मागठाणे, बोरिवली (भारद्वाज बिल्डकॉन), शितलादेवी, अंधेरी पश्चिम; साईबाबा, शीव; शिवभूमी, मोगरा, अंधेरी पूर्व; श्री स्वामी समर्थ, नौपाडा, ठाणे; श्री राज राजेश्वरी, चेंबूर, कुर्ला ( आयआयएफएल स्वतः), हनुमान नगर, आकुर्ली, कांदिवली (गोटामा कन्स्ट्रक्शन), जय अंबे आणि स्वागत, मोगरा, अंधेरी पूर्व (सेवेन आयलंड रिअल्टर्स), माऊली बंदरपाखाडी, कांदिवली (भृगू रिअल्टी), चंदन नगर, विक्रोळी (महादेव स्पेस इनोवेटर), शिवगणेश, वरळी (अनंताया बिल्डकॉन), मूनलाईट, श्री सिद्धीविनायक, जितेश्वर, जुहू वर्सोवा एकता, जुहू वर्सोवा लिंग रोड, अंधेरी पश्चिम (प्रयोक्त्री डील प्रा. लि.), शिवशक्ती व साईनगर, डी. एन. नगर, अंधेरी (एम ८६ रेसिडेन्सी), देवीपाडा, मागठाणे (दोस्ती ग्रुप) आणि हरिहरकृपा, कान्हेरी, बोरिवली (वीणा डेव्हलपर). योजनांना मान्यता मिळालेल्या वित्तीय संस्था : आयआयएफएल फायनान्स लि. – ९, पिरामल कॅपिटल अँड हौसिंग फायनान्स – ५, जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. – ३, एडेलव्हाईस एआरसी – २, एसीआरई – २, संघवी फायनान्स प्रा. लि. – १ आणि थार कमर्शिअल फायनान्स लि. – १.

Story img Loader