मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये असलेल्या रक्ताच्या साठ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या ई-रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची नोंदणी करणे रक्तपेढ्यांना बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला मुंबईतील सरकारी रक्तपेढ्यांनीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यानंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेने केलेल्या दंडात्मक कारवाईलाही या रक्तपेढ्या जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाला रक्त सहज रक्त उपलब्ध व्हावे यासाठी कोणत्या रक्तपेढीमध्ये कोणत्या रक्ताचा साठा उपलब्ध आहे, याची माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने ई-रक्तकोष हे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याचप्रमाणे, राज्य सरकारच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध रक्ताच्या साठ्याची नाेंद करणे राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना बंधनकारक केले आहे. मात्र, डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत मुंबईतील ५४ रक्तपेढ्यांपैकी ३१ रक्तपेढ्यांनी ही रक्तसाठ्याची नोंद करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील रक्तपेढ्या आघाडीवर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सात व राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या पाच आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयातील एक अशा १३ रक्तपेढ्यांनी रक्तसाठ्याची नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.

हे ही वाचा…Ratan Tata Pet Dog: रतन टाटांचा ‘गोवा’ या पाळीव कुत्र्याचा मृत्यू? व्हायरल मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी सांगितलं…

त्यानंतर, या रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मागील दीड वर्षांपासून या रक्तपेढ्यांनी हा दंड भरण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. दंड आकारण्यात आलेल्या रक्तपेढ्यांना वारंवार नोटीस पाठविण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून दंड भरण्यासंदर्भात काहीही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेतील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

हे ही वाचा…विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्रकरणः दोन एक्स हँडलचा वापर करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

रक्तपेढ्यांवर लाखांहून अधिक दंड

मुंबईतील ३१ रक्तपेढ्यांनी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य रक्त संक्रमण परिषदेने कारवाई करून रक्तपेढ्यांना दंड ठोठावला आहे. सर्व रक्तपेढ्यांवर ठोठवलेल्या दंडाची रक्कम ही १ लाख २७ हजार इतकी आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयातील रक्तपेढ्यांवरील दंडाची रक्कमच ७६ हजार रुपये इतकी आहे.

दंड आकारण्यात आलेल्या सरकारी रक्तपेढ्या

सेंट जॉर्जेस रुग्णालय रक्तपेढी – नऊ हजार

जे. जे. रुग्णालय रक्तपेढी – एक हजार

जी. टी. रुग्णालय रक्तपेढी – एक हजार

कामा रुग्णालय रक्तपेढी – एक हजार

जे.जे. महानगर रक्तपेढी – सहा हजार

केईएम रक्तपेढी – तीन हजार

के. बी. भाभा रुग्णालय रक्तपेढी – सात हजार

नायर रुग्णालय रक्तपेढी – तीन हजार

शीव रुग्णालय रक्तपेढी – १० हजार

राजावाडी रुग्णालय रक्तपेढी – एक हजार

बीडीबीए रक्तपेढी – सहा हजार

कूपर रुग्णालय रक्तपेढी – १८ हजार

भाभा ॲटॉमिक रिसर्च रक्तपेढी – तीन हजार