क्रीडापटू व अभिनेत्यांच्या महागडय़ा परदेशी गाडय़ांवरील आयात शुल्क माफ करणाऱ्या अर्थ मंत्रालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनमोल वस्तूंवर मात्र जबरदस्त आयात शुल्क आकारले आहे. महात्मा गांधी यांचा चष्मा, त्यांची पादत्राणे, चरखा, त्यांच्या रक्ताने पावन झालेली माती अशा अनेक गोष्टींच्या लिलावाबाबत उदासीनता दाखवणाऱ्या सरकारने आयात शुल्कात सूट देण्याचेही औचित्य दाखवलेले नाही. अखेर २२ लाखांचे आयात शुल्क भरल्यानंतर कमल मुरारका यांना हा मौल्यवान ठेवा भारतीय भूमीवर आणण्याची परवानगी देण्यात आली.
अर्थ मंत्रालयाच्या या भूमिकेवर माजी लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग आणि समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीकेची झोड उठवली. हा ठेवा मंगळवारी अण्णा हजारे व जन. व्ही. के. सिंग यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आला.
महात्मा गांधी यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या वस्तू भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवे होते. मात्र सरकारने लंडनमधील लिलावात बोलीही न लावण्याचा निर्णय घेतला. अखेर उद्योजक कमल मुरारका यांनी हा ठेवा लिलावातून विकत घेतला. तो भारतात आणण्यासाठी आयात शुल्कमाफी द्यावी, अशी विनंती मुरारका यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली होती. त्याला उत्तर देताना, मुरारका यांनी या चीजवस्तू भारतात विकण्याचा प्रयत्न करू नये. तसेच त्यांनी या वस्तू इतर कोणालाही हस्तांतरित करू नये, अशा अटी अर्थ मंत्रालयाने घातल्या. एवढय़ा अमूल्य वस्तू आपण कोणालाही विकणार नव्हतो. मात्र महात्म्याच्या स्पर्शाने पावन झालेल्या या वस्तू संपूर्ण देशात पोहोचाव्यात आणि या वस्तूंपासून सर्वानीच स्फूर्ती घ्यावी, या इच्छेपोटी आपण त्या अण्णांकडे सोपवण्याचे ठरवले होते. त्यामुळे अखेर आपण आयात शुल्क भरणे पसंत केले, असे मुरारका यांनी सांगितले.

Story img Loader