धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाकडे गेल्याने त्याविरोधात ठाकरे गटाने धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला. या मोर्चा खुद्ध ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. अदाणी समूहाला दिलेल्या या प्रकल्पाविरोधात आवाज उठवताना ठाकरेंनी पोलिसांनाही धारावीकरांच्या बाजूने उभे राहण्याचं आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. जिथल्या तिथं घर हवं. पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायासाठी जागा द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्यांचं सीमांकन द्या. लोणची पापड सारख्या व्यवसायाला खुल्या जागा द्या.”
पुढे ते म्हणाले, “मी असं ऐकलंय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे. मी त्यांनाही सांगतो की, सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका. नोंद तुमच्याकडेही होते आणि जनतेकडेही होते. सरकार कधीही येतं आणि कधीही जातं. पण तुमच्या सदरक्षणाय खलनिग्रहणायला सोडू नका.”
हेही वाचा >> ‘अदाणींनी मुंबईसाठी काय केले? ‘मोदाणी’ला धारावीचे लचके तोडू देणार नाही’, वर्षा गायकवाड यांची टीका
“काही निवृत्त पोलीस आणि त्यांचे गुंड इथे सोडलेले आहे. गुंडागर्दी झाली तर तिथल्या तिथे ठेचा. तुमच्यासोबत पोलीस नाही आले तर मी तुमच्यासोबत येईन”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
५० खोके कमी पडायला लागले म्हणून…
उद्धव ठाकरे म्हणाले, “अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत. यांची मस्ती वाढत चालली आहे. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे.”
हेही वाचा >> VIDEO : “नशिब समजा तुमची स्थिती अजून…”, वर्षा गायकवाडांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
हे सरकार अदाणींच्या दारी आहे
“वर्षा गायकवाड यांनी अदाणींना प्रश्न विचारला, तर भाजपा उत्तर देते. नशिब समजा तुमची अजून महुआ मोईत्रा करण्यात आली नाही. महुआ मोईत्रांनी त्यांना ( अदाणींना ) प्रश्न विचारल्यावर निलंबित करण्यात आलं. नशिब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहात. ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम चालू होता. पण, हे ‘सरकार अदाणींच्या दारी’ आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे.