मुंबई : राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार टिकावे या दृष्टीने रणनीतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी रात्री सविस्तर चर्चा झाली. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे दोन तास झालेल्या या भेटीत एकनाथ शिंदे यांचे बंड व त्यांना मिळालेला आमदारांचा पाठिंबा या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार कसे वाचविता येईल या दृष्टीने विविध पर्यायांवर चाचपणी करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या सरकारची खरी कसोटी ही विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी लागेल. शिंदे यांच्याबरोबर असलेले किती आमदार शिवसेनेला पुन्हा पाठिंबा देऊ शकतात याचा आढावा घेण्यात आला. सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला होता. यानुसार रणनीती आखण्यात येत आहे. कायदेशीर लढाई कशी लढता येईल यावरही खल झाला.
काँग्रेस, राष्ट्रवादीची मुख्यमंत्री ठाकरे यांना भक्कम साथ- अजित पवार</strong>
मुंबई : शिवसेनेतील बंडामुळे अडचणीत आलेले सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी रहायचे आणि सरकार टिकवायचे ही पक्षाची भूमिका कायम राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
जे आमदार गुवाहटीला गेले आहेत ते आम्ही शिवसेनेचे आहोत असे सांगत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून बहुमत आहेच, असा दावा पवार यांनी केला. अजून तरी अधिकृतपणे कुणी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही, त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे, सरकारचे कामकाज सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही, असे ते म्हणाल़े
‘संकटकाळात राणेंना पवारांचीच मदत’
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर, त्यावर धमकीवजा टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला. नारायण राणे यांना त्यांच्या संकटकाळात कितीतरी वेळा पवारसाहेबांनी मदत केली आहे. पाठिंबा व आधार दिला आहे. त्याचे स्मरण जरी त्यांनी केले तरी त्यांना वाटेल आपण केलेले विधान मागे घ्यावे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.