मुंबई : कांदळवने ही फ्लेमिंगोंचे (रोहित पक्षी) अधिवास आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील फ्लेमिंगोंचे हे अधिवास पार्क विकासित आणि संरक्षित करण्याकरिता आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीने दोन महिन्यांत याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिले जातील, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेतन तुपे, आशिष शेलार, संजय केळकर, जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात नेरूळ सीवूड्स येथील डीपीएस तलावाजवळ फ्लेमिंगोच्या झालेल्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुनगंटीवार बोलत होते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे फ्लेमिंगोंचा अधिवास चांगला आहे. इराण, मध्य आशिया आदी ठिकाणांहून फ्लेमिंगो हजारो किलोमीटरचा प्रवास करून या भागात येतात. येथील कांदळवने ही त्यांची अधिवास क्षेत्रे आहेत.

हेही वाचा >>> पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

कांदळवन हे फ्लेमिंगोंचे सुरक्षा कवच असल्याने ते जपले पाहिजे. त्यामुळे या क्षेत्राचे नुकसान करणाऱ्यांना आर्थिक दंडासोबतच आता शिक्षेची तरतूद करण्याबाबतचा विचार केला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हा अधिवास अधिक संरक्षित करण्यासाठी वन विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणाऱ्या समितीत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, सिडको, महानगरपालिकेचे अधिकारी, नगरविकास विभागाचे अधिकारी यांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

फ्लेमिंगोच्या मृत्यूबाबत चौकशी

नेरुळ सीवूडस (नवी मुंबई) येथील डीपीएस तलावाजवळ सहा फ्लेमिंगो पक्ष्यांचा झालेल्या मृत्यूबाबत चौकशी करण्यात आली. त्यांचे शवविच्छेदन केले असता चार पक्ष्यांचा मृत्यू हा श्वसनक्रिया थांबल्याने झाल्याचे कारण समोरआले आहे. इतर दोन पक्ष्यांचे मृतदेह भग्नावस्थेत असल्याने त्याचे कारण समजू शकले नाही. अर्थात, तेथील स्थळ पाहणीनंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने त्या तलावाशेजारील रस्त्यांवर असलेले एलईडी दिवे बदलून तिथे लो प्रेशर सोडियम दिवे अथवा पिवळ्या रंगांचे एलईडी दिवे बसविण्याची शिफारस केल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.