मुंबई : ‘मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे असे नाही’, ‘घाटकोपरची भाषा गुजराती’ अशी वादग्रस्त विधाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी केली. यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांना आयतेच बळ मिळाले. धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे तसेच योगेश कदम या मंत्र्यांवर विरोधकांनी आरोप केले असतानाच आता या मुद्द्याने सरकारची कोंडी झाली.
मराठीच्या मुद्दयांवरून महाविकास आघाडीने भाजपला लक्ष्य केले. मुंबईचे मराठीपण हद्दपार करण्याचा संघ आणि भाजपचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला. जोशी यांच्या वक्तव्यावर चौफेर टीका झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्राची व शासनाची भाषा मराठीच असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत द्यावी लागली. वाद वाढल्याने ‘मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच असून प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, ’ अशी सारवासारव जोशी यांना करावी लागली.विधिमंडळात पडसाद
घाटकोपर येथे एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी यांनी मुंबईच्या विविधतेतील एकतेवर भाष्य केले होते. ‘मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. येथे अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, गिरगावची भाषा हिंदी आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकली पाहिजे, असे नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले.
शासनाची भाषा मराठीच -फडणवीस
विधानसभेत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) गटनेते भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून सरकारने गौरव केला. त्याच वेळी भय्याजी जोशी हे मराठीच्या विरोधात मुंबईत येऊन विधाने करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जाधव यांनी केली. मुंबई, महाराष्ट्राची व शासनाची भाषा मराठीच आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्याने प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे आणि बोलली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी मांडली. राज्यात अन्य भाषांचाही सन्मान आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा अपमान करणार नाही. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तोच अन्य भाषांवर प्रेम करतो, अशी पुष्टीही फडणवीस यांनी जोडली.
गुन्हा दाखल करा – ठाकरे
भय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. नाहीतर, हा भाजप आणि संघाचा छुपा कार्यक्रम (अजेंडा) आहे, हे मान्य करावे, अशी टीका त्यांनी केली. मुंबईत आता मराठी बोलणेही कठीण झाल्याची टीका राष्ट्रवादीचे गटनेेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.नवा संघर्ष पेटविण्याचा संघाचा डाव – राज ठाकरे
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे गरजेचे नाही, असे विधान राजकीय हेतूने केले असून, असल्या काड्या घालून राज्यात नवा संघर्ष निर्माण करण्याचा संघाचा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केला. मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे जगाला समजते तर जोशी बुवांना कसे समजत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन जोशी यांचा निषेध करणार का असा सवालही त्यांनी केला.
जोशींची सारवासारव
वादानंतर भय्याजींनी सारवासारव करीत मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व प्रत्येकाला मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे म्हटले आहे. माझ्या बोलण्यामुळे काही गैरसमज निर्माण झाले आहेत. मी विविध भाषांच्या सह अस्तित्वावर बोलत होतो, असे जोशी यांनी नमूद केले.
मुंबई, महाराष्ट्राची व शासनाची भाषा मराठीच आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्याने प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे आणि बोलली पाहिजे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
देशात भाषावार प्रांतरचना झाली, आता गल्लीवार प्रांत रचना केली जात आहे का? भय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख