मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) खाते उघडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून व्यावसायिकतेचे निकष पूर्ण करीत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने विहित केलेली पात्रता व प्रक्रिया पूर्ण करीत असल्याने सहकार विभागाने केलेल्या शिफारशीनुसार टीजेएसबीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली. तसेच निवृत्तिवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरिता बँकेस प्राधिकृत करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नागरी बँकांच्या लेखापरीक्षण अहवालात बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन अशा नागरी सहकारी बँकांची यादी दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात सहकार खात्याच्या सल्ल्याने सुधारित करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. महायुती सरकारने भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेत महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांना निधी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. यापाठोपाठ आता टीजीएसबी बँकेची निवड करण्यात आली आहे.