राज्य सरकारने जारी केलेला संपातील सहभागास मनाई करणारा आदेश धुडकावून शासकीय कर्मचाऱ्यांनी उद्या बुधवारचा एक दिवसाचा बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रामुख्याने राज्यभरातील तृत्तीय व चतुर्थश्रेणीचे कर्मचारी मोठय़ा संख्येने बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकाही संपात उतरणार असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे, बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एस.आर. भोसले व सरचिटणीस रमेश सरकटे यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. जिल्हा परिषदांमधील कर्मचारी काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार आहेत, असे महाराष्ट्र जिल्हा परिषद युनियनचे नेते शरद भिडे यांनी जाहीर केले आहे. केंद्र सरकारने अनेक कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगारांचे कायदेशीर संरक्षण संपुष्टात येणार आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. महागाई कमी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या व अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध कामगार संघटांनी उद्या ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये केंद्रीय व राज्य कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. राज्यातील कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्यास मनाई करणारा आदेश सरकारने काढला आहे. त्याचा भंग केल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरीही तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे. त्यामुळे त्याचा सरकारी कामकाजावर परिणाम होणार आहे. शासकीय रुग्णालयांमधील कर्मचारी व परिचारिका बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2015 रोजी प्रकाशित
मनाई आदेश धुडकावून सरकारी कर्मचारी संपावर!
राज्य सरकारने जारी केलेला संपातील सहभागास मनाई करणारा आदेश धुडकावून शासकीय कर्मचाऱ्यांनी उद्या बुधवारचा एक दिवसाचा बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
First published on: 02-09-2015 at 01:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government employees to participate in nationwide strike