मुंबई : आषाढी वारीनिमित्त मुख्य १२ पालख्यांसह हजारो पालख्या राज्याच्या विविध भागातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. या पालख्यांमध्ये १५ लाखांपेक्षा अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत सरकारकडून वारकऱ्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या उपचारासाठी औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक स्तरावर ३,८० लाखांची औषधे खरेदी करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे.
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे २५८ आपला दवाखाने तात्पुरत्या स्वरुपात सुरू केले आहेत. वारकऱ्यांच्या तपासणीसाठी ६ हजार ३६८ इतके अधिकारी व कर्मचारी, १३६ स्त्री रोग तज्ज्ञ, रुग्णवाहिका, ८७ अतिदक्षता विभाग सुरू केले आहेत. या सुविधेच्या माध्यमातून आतापर्यंत ३ लाख १४ हजार ४९९ वारकऱ्यांना मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीतील १ लाख ७३ हजार ७३७ वारकऱ्यांवर तर श्री संत तुकाराम महाराज दिंडीतील १ लाख १ हजार ३९ वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा…केईएम रुग्णालयातील रुग्ण अहवाल कागदी आवरण दुरूपयोग प्रकरणी चौकशी
वारीदरम्यान आरोग्य समस्या निर्माण होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता औषधे व अन्य साधन सामुग्रीचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थानिक स्तरावर तातडीने औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून ही औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. स्थानिक स्तरावर औषध खरेदीसाठी पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ३५ लाख तर सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ३५० लाख रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वारीदरम्यान वारकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.