महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरले आहे आणि त्यामुळे १ मेच्या औरंगाबाद सभेसाठी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेऊन लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. त्यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत दिली होती. राज्य सरकारने कारवाई केली नाही, तर त्यांच्या आमचे कार्यकर्ते मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवतील,’ असा इशाराही त्यांनी दिली होता. त्यानंतर आता संजय निरुपम यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द प्रिंन्टच्या वृत्तानुसार, राज्यातील जातीय तणाव भडकवण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे सांगत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सभेच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. संजय निरुपम यांनी मुंबई पोलिसांकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंवर कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद येथील सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत हे मला समजत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे,” असे संजय निरुपम म्हणाले.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे ते म्हणाले. देशात आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असेही संजय निरुपम म्हणाले.

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – संजय निरुपम

“भाजपाच्या खासदाराचे वक्तव्य मी ऐकले आहे. राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही या त्यांच्या मताशी मी सहमत नाही. अयोध्याला जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण राज ठाकरे अयोध्येला जात आहेत म्हणजे ते हिंदुत्वाच्या परंपरेचा स्विकार करत आहेत आणि उत्तर भारतात जात आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे अयोध्येला जाण्याआधी त्यांनी या लोकांची माफी मागायला हवी,” असे संजय निरुपम म्हणाले.

दरम्यान, मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्यासाठी लाऊडस्पीकर लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील न्यायालयाने प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली २००८ च्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याआधी ३ मे रोजी सांगलीतील न्यायालयाने ठाकरे यांच्याविरुद्ध २००८ च्या खटल्यात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government fears raj thackeray sanjay nirupam made serious allegations against his own government abn