पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका; गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातून पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून त्याचा प्रचार व प्रसार करून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे तसेच प्रकाशक व पुस्तक विक्रेते त्यांच्याविरोधात संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या संदर्भात बालाजी तांबे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.

आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तकातून पुत्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सांकडे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक व विक्रेत्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर संबंधितांकडून खुलासे मागविण्यात आला होते. हा विषय आयुर्वेदशास्त्राशी संबंधित असल्याने त्याबाबत तज्ज्ञांचे मत घेण्याचे ठरले. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. विद्यापीठाने तांबेलिखित पुस्तकाचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी समिती नेमली होती.
डॉ. बालाजी तांबे यांच्यावर गुन्हा?

समितीने या पुस्तकातील मजकुराचा बारकाईने अभ्यास करून आपला अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला. त्यात बालाजी तांबे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून लिंगनिवडीबाबतचा आरोपीचा हेतू सिद्ध होतो, त्यामुळे लोकांमध्ये पुरुषप्रधानत्वाचा दृष्टिकोन दृढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याबद्दलच्या जनजागृतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गर्भलिंग पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्य आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण) अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांचा अभिप्राय मागविण्यात आला. त्यावर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू  केली.
पुत्रप्राप्तीचा प्रसार नाही!

अतिरिक्त संचालकांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर, राज्य सरकारच्या वतीने संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजीव घोडके यांनी १३ जून रोजी संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बालाजी तांबे, पुस्तकाचे प्रकाशक व विक्रेता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार तांबे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– डॉ. राजीव घोडके, वैद्यकीय अधिष्ठाता, संगमनेर ग्रामीण रुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government filed crime against balaji tambe