लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : करोनाकाळात घेतलेल्या कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांबाबत गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करूनही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. करोना लसीमुळे प्राण गमावलेल्या नागरिकांबद्दल सरकारच्या मनामध्ये कोणतीही भावना नसून, सरकार कोविशील्डच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अवेकन इंडिया मुव्हमेंटकडून करण्यात आला आहे. लसीकरणामुळे आपल्या नातेवाईकांना गमाविणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून अवेकन इंडिया मुव्हमेंट धडपड करीत आहे. कोविशील्ड लसीसोबतच या संस्थेने मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित केले आहे.
ॲस्ट्राझेनेका या करोना लसीमुळे दुष्परिणाम होऊ शकतात, असे इग्लंडमधील एका न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान लस निर्माता कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्त गोठणे आणि शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. सीरम इन्स्टिट्यूटने भारतात ‘कोविशील्ड’ नावाने ॲस्ट्राझेनेका लस तयार केली असून इंग्लंडमधील कंपनीने त्याबाबत कबुली दिल्यानंतर कोविशील्ड लसीचा मुद्दा ऐरणीवर आला.
देशात लसीकरण सुरू झाल्यापासून कोविशील्डचे दुष्परिणाम नागरिकांवर दिसत असल्याचा दावा आम्ही करत होतो. या लसीमुळे होणाऱ्या मृत्यूची माहिती पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या पोर्टलवर अद्ययावत केली जात आहे. लसीमुळे होणाऱ्या या मृत्यूच्या चौकशीची मागणी आम्ही वारंवार सरकारकडे करत होतो. मात्र दोन वर्षे उलटून गेली तरी अद्याप आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही. आयसीएमआरकडे लेखी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे अवेकन इंडिया मुव्हमेंटचे अंबर कोईरी यांनी सांगितले.
कोविशील्ड लस घेतल्यानंतर देशभरात जवळपास १९ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आम्ही लढा देत आहोत. यासाठी आम्ही न्यायालयातही धाव घेतली आहे. नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे अवेकन इंडिया मुव्हमेंटच्या सुकाणू समितीच्या सदस्या निशा कोईरी यांनी सांगितले.
आणखी वाचा-मानखुर्दमध्ये विषबाधेमुळे तरुणाचा मृत्यू, रस्त्यावर तयार केलेले बर्गर खाल्ल्यामुळे १२ जणांना विषबाधा
एचपीव्ही लसीविरुद्ध मोहीम
गर्भाशयाचा कर्करोग होवू नये यासाठी एचपीव्ही ही लस केंद्र सरकारकडून दिली जाते. परंतु या लसीच्या दुष्परिणामांचीही नोंद झाली आहे. ही लस कर्करोगापासून संरक्षण करत असली तरी महिला गर्भवती राहण्याच्या क्षमतेवरही परिणाम करते. त्यामुळे एचपीव्ही लसीविरोधात मोहीम सुरू केल्याचे निशा कोईरी यांनी सांगितले.