राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना; २०३० पर्यंतचा कृती आराखडा तयार करणार

जगभरातील प्रगत देशांमधील वैद्यकीय ज्ञानाच्या तोडीस तोड असे ज्ञान राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत २०३० पर्यंतचा कृती आराखडा तयार करण्याचे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांवर सोपविण्यात आले आहे. अधिष्ठात्यांनी सादर केलेल्या अहवालावर तज्ज्ञांची समिती नेमून अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे.

राज्यात सध्या ३८ वैद्यकीय महाविद्यालये, २९ दंत वैद्यकीय महाविद्यालये, ६३ आयुर्वेदिक महाविद्यालये, ४६ होमिओपॅथी व सहा युनानी महाविद्यालये आहेत. याशिवाय १०० नर्सिग महाविद्यालये व दहा अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवला जातो. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सध्याची परिस्थिती, विद्यार्थी संख्या, खाटांची उपलब्धता, अन्य सेवा सुविधा, बाह्य़रुग्ण व आंतररुग्ण तसेच सीटी स्कॅनसह प्रमुख उपकरणांवर होणाऱ्या चाचण्याच्या माहितीसह २०३० सालपर्यंत कोणते उपक्रम राबविता येतील. वैद्यकीय ज्ञान अद्ययावत म्हणजेच जागतिक दर्जाच्या बरोबरीचे राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी येणारा खर्च आणि भारतातील आजारांचा विचार करून ग्रामीण आरोग्यासाठी कोणते योगदान देता येईल याचे तपशीलवार अहवाल तयार करण्याचे आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून, प्रत्येक महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याने विभागप्रमुखांशी सविस्तवर चर्चा करून विभागातील गरजांचा अभ्यास करून हा अहवाल द्यावा अशा सूचना केल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी शासकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना आपल्या महाविद्यालयाचा कृती आराखडा बनविण्यास सांगितले असून या सर्व महाविद्यालयांचे अहवाल आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने अंतिम कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी जी समिती नेमण्यात येणार आहे त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण संचालक, काही महाविद्यालयांचे अधिष्ठाता, निवृत्त अधिष्ठाता तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.या योजनेसाठी लागणारा निधी शासनाकडून जसा दिला जाणार आहे तसेच सीएसआर, राज्यसभा सदस्य आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन परदेशी स्थिरावलेल्या डॉक्टरांकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणा

वाढत्या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे नेमकेपणे आजाराचे स्वरूप समजून उपचाराची दिशा स्पष्ट करता येते हे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅनसह अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. नवनवीन साथीचे आजार व त्यावरील संशोधनही महाविद्यालयांमध्ये होणे अपेक्षित असून त्यासाठी आवश्यक त्या प्रयोगशाळा तयार करणे, वैद्यकीय संशोधनाला उत्तेजन मिळण्यासाठी नवीन उपक्रमांची आखणी करणे, तसेच नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्यातून नवीन तंत्रज्ञान व ज्ञान डॉक्टरांना उपलब्ध व्हावे यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची योजनाही या अहवालात अपेक्षित आहे.

अतिदक्षता विभागातील उपचार व प्रशिक्षणासह जागतिक दर्जाच्या तोडीस तोड प्रशिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांना मिळावे ही संकल्पना आगामी काळात राबविण्यात येईल. गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

Story img Loader