केंद्र सरकारने लेव्ही साखरेचा कोटा रद्द केल्याने निविदा मागवून साखर खरेदी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील सुमारे पावणेतीन कोटी नागरिकांना १३ रुपये ५० पैसे दराने शिधावाटप दुकानांवर ही साखर मिळणार आहे.
महागाईने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. निवडणुका तोंडावर असल्याने लोक नाराज होतील, असे कोणतेही निर्णय आता घेऊन नयेत. लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असा एकंदरीत मंत्रिमंडळात सूर होता. त्याची सुरुवात शिधावाटप यंत्रणेत स्वस्त दरात साखर देण्याच्या निर्णयापासून करण्यात आली. त्याकरिता पुढील दहा महिन्यांसाठी ३ लाख, २४ हजार, ४२४ क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खुल्या बाजारात कितीही दर असला तरी साखर खरेदी करून ती शिधावाटप यंत्रणेत १३ रुपये ५० पैसे किलो दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. एरवी माणशी ५०० ग्रॅम, तर सणासुदीच्या काळात ६६० ग्रॅम साखर देण्यात येणार आहे. अंत्योदय योजनेतील तसेच दरिद्रय़रेषेखालील व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. स्वस्त दरात साखर देण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला प्रतिकिलो १८ रुपये ५० पैसे अनुदान मिळणार आहे. खुल्या बाजारात त्यापेक्षा जास्त दर असेल तर तेवढी अधिकची रक्कम सरकार आपल्या तिजोरीतून खर्च करणार आहे. खुल्या बाजारातील साखरेच्या दरात चढ-उतार होत असतो, त्याचा विचारुन सहा महिन्याच्या कालाधीसाठी ई -निविदेच्या माध्यमातून साखर पुरवठा करण्याचे कंत्राट देण्याचे ठरविण्यात आले आहे.

Story img Loader