मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी पिंजाळ जलस्त्रोत विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने ठाणे जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यात पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यास मुंबई महानगरपालिकेस अखेर अनुमती दिली. पिंजाळ बहुउद्देशिय प्रकल्पातील एकूण उपलब्ध पाण्यापकी ५० दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी राखून ठेवून उर्वरित पाणी मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांना उपलब्ध करता येईल.
मुंबई महानगरपालिकेने पिंजाळ प्रकल्पाच्या सर्वेक्षणाबरोबरच सुसाध्यता अभ्यास हाती घेतला असून हा प्रकल्प राबविण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती महापालिकेने राज्य शासनाकडे केली होती. जव्हार तालुक्यातील खिडसे गावनजीक या प्रकल्पातंर्गत धरण विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६० हजार कोटी इतका खर्च येणार असून या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ३१६ चौरस कि.मी. एवढे आहे. पिंजाळ व दमणगंगा नदीजोड प्रकल्पातून मिळणारे पाणी गुंडवलीपर्यंत नेण्यासाठी महानगरपालिकेतर्फे वहन व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दमणगंगा नदीजोड प्रकल्पातून जे पाणी मुंबईला मिळणार आहे ते पिंजाळ धरणामध्ये साठविण्यात येणार आहे. पिंजाळ जलस्त्रोत विकसित झाल्यानंतर मुंबईला प्रतिदिन ८६५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल.

Story img Loader