सरकारने मराठा आरक्षणासोबत मुस्लिम आरक्षणाचाही कायदा का आणला नाही असा प्रश्न विचारत सरकारने आता मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे अशी मागणी काँग्रेस आमदार नसीम खान यांनी केली आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत एक सूचक वक्तव्य केलं. आंदोलन करू नका, आता १ डिसेंबरपर्यंत जल्लोषाची तयारी करा असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आता नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाचीही मागणी पुढे केली आहे.
आघाडी सरकारच्या काळात मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं पाच टक्के आरक्षण भाजपा सरकारने थांबवलं, असाही आरोप नसीम खान यांनी केला.
आघाडी सरकारने आरक्षण देताना धार्मिक आरक्षण दिलं नव्हतं. मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं होतं. मराठा समाजासोबत ते पण दिलं पाहिजे, असेही नसीम खान यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच मुस्लिम आरक्षणासंदर्भात अधिवेशनात कायदा आणला गेला पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार फक्त तारीख पे तारीख देत आहे असेही खान यांनी म्हटलं आहे. आघाडी सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं होतं, भाजपाने ते रद्द केलं ते आता देण्यात यावं असंही खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणापाठोपाठ मुस्लिम आरक्षणाचीही मागणी होते आहे.