मुंबई : नाट्यगृहामागचे अर्थकारण समजल्याशिवाय ती सुधारण्याची जबाबदारी डोक्यावर घेऊ नये, असा अनुभवी सल्ला ज्येष्ठ नेते आणि नाट्यपरिषदेचे विश्वस्त शरद पवार यांनी परिषदेचे अध्यक्ष आणि अन्य नाट्यकर्मी यांना दिला. त्याऐवजी नाट्यगृहांवर कमीत कमी कर, देखभाल खर्च आणि वीज खर्च यांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली तर हा व्यवसाय तग धरेल. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ खास पुरस्कार सोहळा शुक्रवारी यशवंतराव नाट्यसंकुल माटुंगा येथे झाला. यावेळी पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याचे औचित्य साधून नूतनीकरणानंतर पुन्हा कार्यरत झालेल्या यशवंत नाट्य मंदिराचे रसिकार्पण करण्यात आले. नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, उद्याोगमंत्री तथा अ.भा. मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, मोहन जोशी, अशोक हांडे, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार आणि नाट्यकर्मीही यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात; १५ ते २१ जूनदरम्यान होणाऱ्या महोत्सवात ५९ देशांतील ३१४ लघुपट पाहता येणार

आपल्या कामातून प्रसिद्धी मिळवणे कठीण आहे, पण ती टिकवणे त्याहीपेक्षा अधिक कठीण आहे. मला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आणि त्यांच्या आशीर्वादाने मला ते कायम ठेवता आले. या गोष्टीचा प्रचीती मला यावर्षी मिळालेल्या चार मोठ्या पुरस्कारांमुळे आली आहे, असे सांगत अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

पुरस्कारांचे मानकरी

● नियम व अटी लागू’ – सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक चंद्रकांत कुलकर्णी – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (नियम व अटी लागू)

● संकर्षण कऱ्हाडे – सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट लेखक (नियम व अटी लागू)

● लीना भागवत – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री( इवलेसे रोप)

● मयुरेश पेम – सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता (ऑल द बेस्ट)

● शलाका पवार – सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री (हीच तर फॅमिलीची गंम्मत)

● आशुतोष गोखले -सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार (नाटक – जर तर ची गोष्ट)

● पर्ण पेठे – सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार (नाटक – चार चौघी)

● संदेश बेंद्रे – सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (नाटक – २१७ पद्मिानी धाम)

● अमोघ फडके – सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना (नाटक- जर तर ची गोष्ट)

● सौरभ भालेराव – सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार (नाटक – आजीबाई जोरात)

● उल्लेश खंदारे – सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार (नाटक – कुर्र)

● संगीत जय जय गौरीशंकर – सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक

● विवेक बेळे – प्रायोगिक नाटक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( नाटक – यह जो पब्लिक है)

● प्रशांत निगडे – प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता ( नाटक – आय एम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ)

● बकुळ धवने – प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाटक – दि फिअर फॅक्टर)

● विशारद गुरव – प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता (नाटक – संगीत जय जय गौरीशंकर) ● शारदा शेटकर – प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री (नाटक -संन्यस्त खड्ग)