रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून मुंबईतील औषध विक्रेत्यांनी केवळ सायंकाळी सहापर्यंतच औषध दुकाने चालू ठेवण्याचे आठमुठे धोरण अवलंबिल्याने त्यांच्यावर ‘मेस्मा’ (अत्यावश्यक सेवा) कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.
संपकाळात औषध दुकाने सायंकाळी सहापर्यंतच सुरू ठेवण्याच्या औषध विक्रेत्यांनी घेतलेल्या निर्णयाला अ‍ॅड्. दत्ता माने यांनी आव्हान देत जनहित याचिका केली आहे. औषध विक्रेत्यांच्या या निर्णयामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. माने यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनूप मोहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस सरकारी वकील संदीप शिंदे यांनी संपकरी औषध विक्रेत्यांविरुद्ध ‘मेस्मा’ लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती दिली. परंतु ‘मेस्मा’ लावण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी औषध विक्रेत्यांच्या समस्याही गांभीर्याने ऐकाव्यात, अशी सूचना न्यायालयाने सरकारला केली.
दरम्यान, याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी सरकार आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे दोन आठवडय़ांचा वेळ मागण्यात आल्यावर न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करीत सुनावणी तहकूब केली.

Story img Loader