आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर; केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद पदवीधर

मुंबई : राज्यातील १५ जिल्ह्य़ांमधील १२६४ उपकेंद्रे अद्ययावत करून त्या ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या आयुर्वेद विषयातील पदवीधरांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सहा महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरातील १५ जिल्ह्य़ांमधील १२६४ उपकेंद्राची निवड करून त्यांना आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांपैकी अत्यावश्यक सेवा उपकेंद्रामध्ये सुरू करण्याच्या उद्देशाने ही केंद्र अद्ययावत करून आरोग्यवर्धिनी केंद्रांची स्थापना केली जाईल. केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक आणि उपकेंद्रांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा सेविकांचा समावेश असेल. केंद्रावर १२ सुविधा देण्यात येणार असून प्रसूतीसह नवजात बालकांसाठी अत्यावश्यक सुविधा, संसर्गजन्य रोगांवर उपचार, कुटुंबनियोजन कार्यक्रम, लसीकरण, किशोरवयातील बालकांचे आरोग्य, असंसर्गजन्य रोगांची तपासणी आणि उपचार, मनोरुग्णांना उपचार, कान, नाक, घसा यासह हाडांचे आणि दातांच्या आजारावरील प्राथमिक उपचार देण्यात येतील.

या केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांचे प्रशिक्षण अजून झालेले नाही.

केंद्रावर आयुर्वेद विषयातील पदवीधराची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअतंर्गत आधुनिक मध्यमस्तरीय सेवा प्रदाता अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम आरोग्य विभागाअंतर्गत २०० खाटांच्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आयुर्वेदशास्त्राचे पदवीधर विद्यार्थी राज्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये सेवा देण्यासाठी पात्र असतील.

या जिल्ह्यंमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रे

राज्यातील गडचिरोली (२३८), उस्मानाबाद (७८), नंदुरबार (१७७), वाशिम (१०८), वर्धा (४१), भंडारा (२५), सातारा (४७), चंद्रपूर (५०), सिंधुदुर्ग (८०), नांदेड (६०), जळगाव (२६), लातूर (३३), िहगोली (१३१), अहमदनगर (३५), पालघर (१३५) या जिल्ह्य़ांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. २०१६-१७ मध्ये नाशिक आणि पालघर मध्ये मिळून ३० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. २०१७-१८ मध्ये नाशिक, सातारा, पुणे, चंद्रपूर, वर्धा, भंडारा येथे २५० केंद्रांची निवड करण्यात आली होती.

Story img Loader