पुरेशी मुदत देऊनही संबंधित यंत्रणेकडे नोंदणी न करणाऱ्या विवाह मंडळांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुंबईतील विवाह मंडळे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर विवाह मंडळांचा शोध घेण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, गुगल सर्चची मदत घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मुंबईमध्ये केवळ २०२ वधू-वर सूचक मंडळांनी पालिकेकडे नोंदणी केली आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये गल्लीबोळात विवाह मंडळे, वधू-वर सूचक मंडळे सुरू झाली आहेत. आपल्या मुला-मुलींचे विवाह जुळावेत यासाठी उंबरठे झिजवू लागू नयेत म्हणून अनेक जण मोठय़ा विश्वासाने विवाह मंडळे, वधू-वर सूचक मंडळांच्या कार्यालयात धाव घेतात. या मंडळांवर कोणाचेच नियंत्रण नाही. तसेच त्यांची कुठे नोंदणीही केली जात नाही. त्यामुळे मुंबईसह राज्यामध्ये विवाह जुळविण्याचे काम करणारी किती मंडळे आहेत याची आकडेवारी सरकारी यंत्रणांकडे नाही. काही वेळा या मंडळांकडून वधू-वरांच्या मात्या-पित्यांची फसवणूक झाल्याचे प्रकारही घडले आहेत. या प्रकरणांची गंभीर दखल घेत न्यायालयाने वधू-वर सूचक मंडळांची नोंदणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व त्या अंतर्गत महाराष्ट्र मंडळ व विवाह नोंदणी नियम १९९९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक विवाह मंडळाची नोंदणी संबंधित निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांच्याकडे करणे बंधनकारक करण्यात आले. राज्य सरकारच्या आरोग्य सेवा (आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी) विभागाने आपापल्या कार्य क्षेत्रातील विवाह मंडळांची नोंदणी करण्याचे आदेश आरोग्य सेवा तथा निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच पालिकांचे कार्यकारी अधिकारी तथा विवाह निबंधकांना दिले होते. आरोग्य सेवा तथा निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी विभागाने २३ मार्च २०१६ रोजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून विवाह मंडळांना नोंदणी करण्याचे आवाहनही केले होते. तसेच मुंबई महापालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांमध्ये विवाह मंडळांची नोंदणी करून घेण्याची व्यवस्था केली होती. पालिका कार्यालयांमध्ये केवळ २०२ विवाह मंडळांनी नोंदणी केली आहे. मुंबईमध्ये गल्लीबोळात छोटी-मोठी अनेक विवाह मंडळे आहेत. परंतु नोंदणीसाठी विवाह मंडळांकडून प्रतिसादच मिळाला नाही. दिलेल्या मुदतीमध्ये नोंदणी करणाऱ्या विवाह मंडळांविरुद्ध आता कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. विवाह मंडळांनी गल्लीबोळांमध्ये आपली कार्यालये थाटली आहेत. तसेच काही जण आपल्या घरीच मंडळाचा कारभार चालवीत आहेत. त्यामुळे या मंडळांचा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना पडला आहे.
‘गुगल’वरुन शोध, वृत्तपत्रातील जाहिरातींचीही तपासणी
आरोग्य विभागाच्या आदेशानुसार वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वधू-वर सूचक मंडळांच्या जाहिरातींची तपासणी करण्यास अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. तसेच गुगल सर्चच्या माध्यमातूनही या मंडळांचा शोध घेण्यात येणार आहे. नोंदणी न करणाऱ्या मंडळांवर विवाह नोंदणी कायद्यातील नियम १२ (२) अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
नोंदणी टाळणाऱ्या विवाह मंडळांवर कारवाईचा बडगा
मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये गल्लीबोळात विवाह मंडळे, वधू-वर सूचक मंडळे सुरू झाली आहेत.
Written by प्रसाद रावकर
First published on: 13-07-2016 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government to take action against marriage beuro for avoiding registration