सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जंगली हत्ती, गवे, रेडे आदींमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई दुप्पट करण्याचा विचार राज्य शासन करीत असून फळांऐवजी फळझाडांसाठी भरपाई दिली जाईल, अशी घोषणा वन राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली.
विनायक राऊत, विजय सावंत आदींनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना दिली होती. या हत्तींमुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होत असून शेतातून घरी आणलेल्या भाताचेही नुकसान होत आहे, सुपारी, आंब्याची कलमे, काजू यांचे नुकसान होत आहे, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले. या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळावी, याकडे लक्ष वेधण्यात आले.
सरकार हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी मोहिमा राबवीत असून सौरऊर्जेवर आधारित कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ७० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. हत्ती किंवा इतर कारणांमुळे होणारे फळझाडांचे नुकसान भरुन देण्यासाठी त्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून मूल्यमापन केले जाईल आणि मंत्रिमंडळापुढे फळझाडांच्या भरपाईचा मुद्दा ठेवण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.