मालवणी जत्रा, कोळी महोत्सव आदी मनोरंजनात्मक उपक्रमांच्या धर्तीवर आता सरकारी योजनांची माहिती देणारी आणि सर्वसामान्यांशी संबंधित अनेक सरकारी कामे ‘ऑन दी स्पॉट’ मार्गी लावणारी अनोखी जत्रा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे भरणार आहे. आपल्या एखाद्या छोटय़ा कामासाठी सरकारी कार्यालयात वारंवार घालाव्या लागणाऱ्या खेटय़ातून आदिवासींची सुटका होणार आहे.
 कोणताही यात्रा म्हटली की, त्यात देवाची पालखी, मिरवणूक नवस आणि यात्रेकरूंसाठी होणाऱ्या जंगी जेवणावळी ठरलेल्या असतात. मात्र मुरबाडमध्ये येत्या २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस भरणारी ही जत्रा कोणत्याही देवाला नव्हे तर मतदार राजाल प्रसन्न करण्यासाठी भरणार आहे. दुर्गम आणि आदिवासी बहुल अशा या तालुक्यात मुळातच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे या योजनाचा प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळणे दुरापास्तच असते. त्यामुळे या योजना आणि त्याचे लाभ कागदावरच राहतात.
हे चित्र बदलण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी ही अभिनव जत्रेची संकल्पना मांडली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या उपक्रमास महसूल यंत्रणेच्या सहकार्याचा हात पुढे केला. त्यातूनच तीन दिवस भरणाऱ्या या जत्रेत राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व घटकांसाठी असलेल्या विविध योजनांचे स्टॉल मांडले जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक स्टॉलमध्ये त्या विभागाचे तहसिलदार, गट विकास अधिकारी, वनाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, शिक्षणाधिकारी असे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सातबारा, शिधापत्रिका, दारिद्य््रारेषेखालचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, एकाद्याला वीजेचे मिटर हवे, किंवा शेतातील मातीचे परिक्षण करून घ्यायचे असेल, त्यांची सर्व कामे या ठिकाणी त्वरित करून दिली जाणार आहेत. या ठिकाणी सरकारी कामांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून लोकांची कोणत्याही प्रकारची कामे तसेच त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचे लाभ या लोकांना प्रत्यक्ष मिळवून दिले जाणार आहेत. या यात्रेत किमान १५ ते २० हजार गरजू नागरिक सहभागी होतील अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. विशेष म्हणजे आम आदमी विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ९ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना वर्षांला १२०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. तालुक्यातील १० हजार मुलांना या योजनेचा लाभ करून देण्यात आला असून त्याची सुरूवातही यावेळी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader