मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या राज्यपालांनी सत्ताबदल झाल्यावर निवडणुकीला लगेचच कशी मान्यता दिली, असा सवाल करीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाविकास आघाडी सत्तेवर असताना काँग्रेसचे नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. तेव्हापासून हे पद रिक्तच राहिले. हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी विनंती आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून केली होती; परंतु त्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंबंधीच्या नियमातील बदलाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत राज्यपालांनी त्यास परवानगी नाकारली होती. मग आताही सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांनी परवानगी कशी दिली, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. लोकशाहीची आणि राज्यघटनेची थट्टा चालविली आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.