मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून विनंती

मुंबई : विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली असता त्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन  दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेवरील रखडलेल्या नियुक्त्या लवकर कराव्यात यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अजितदादा आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. सुमारे तासभराच्या भेटीत राज्यासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात पूरपरिस्थिती, पीकपाणी, करोना, करोना वाढू नये म्हणून केंद्र सरकारने केलेल्या सूचना आदी विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना माहिती अवगत करून दिली तर राज्यपालांनी काही प्रतिप्रश्न केले, असे अजित पवार यांनी सांगितले.

विधान परिषदेवरील नियुक्त्या लवकर कराव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली असता, या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती पवार यांनी दिली. यावरून राज्यपाल विधान परिषदेवरील नियुक्त्या लगेचच करणार नाहीत हेच सूचित होते.

विधान परिषदेवरील रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य विनाविलंब पार पाडावे, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र यासाठी कालमर्यादा दिलेली नाही. घटनेतही सरकारने सादर केलेल्या नावांवर निर्णय घेण्यासाठी राज्यपालांना कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नाईक, कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल अनुक्रमे टी. एन. चतुर्वेदी, एच. आर. भारद्वाज किंवा वजूभाई वाला यांनी काही नावांवर आक्षेप घेत नावे परत पाठविली होती. तसेही काही कोश्यारी यांनी अद्याप केलेले नाही.

राज्यपालांचे मौन

विधान परिषदेवरील आमदार नियुक्तीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विनंती पत्र राज्यपालांना दिले पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ५० मिनिटांच्या भेटीत राज्यपालच ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बोलल्याचे समजते.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor assurance about the appointment of mlas akp