बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज सामान्य व्यक्ती उच्च पदावर जाण्याचे स्वप्न बघू शकतो, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी चैत्यभूमीवरून जनतेला संबोधित केले.
हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलो- एकनाथ शिंदे
“आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र सैनिकांनी योगदान दिले. त्यापैकी एक सूर्या सारखं चमकणारं नावं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेबांनी दलित, पीडित, वंचितांसाठी भरीव असं काम संविधानाच्या माध्यमातून केलं. त्यांना एकप्रकारे संजिवनी देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला आहे. आज कोणीही या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघू शकतो. हे आज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच शक्य झाल आहे ”, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली.
हेही वाचा – राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, म्हणाले “डॉ. आंबेडकर सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग…”
“आज असं एकही क्षेत्र नाही, ज्यामध्ये बाबासाहेबांनी लिखान केलं नाही. शिक्षण, आर्थिक, रक्षा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अद्भूत योग्यदान दिलं आहे. समाजाला एकत्र करण्याचं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आहे ”, असेही ते म्हणाले.
“आज बाबासाहेबांना केवळ श्रद्धांजली देऊन चालणार नाही. तर त्यांनी दाखवलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल. जे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं, ते आज पूर्ण होताना दिसून येत आहे. मला विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या सहयोगाने आपला देश आणखी पुढे जाईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.