मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे २४-२५ नोव्हेंबरला नवी दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रातील उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी हे दिल्लीतील उच्चपदस्थांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात आंदोलने सुरू आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य नेत्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोश्यारी यांना राज्यपालपदावरुन हटवावे, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वाचेच कायम आदर्श आहेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. पण, गेल्या वर्षभरात काही ना काही वक्तव्यांवरून राज्यपाल कोश्यारी हे अडचणीत आले आहेत. त्यांच्या विधानावरून भाजपचीही कोंडी होत आहे.
वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणास्तव आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य उच्चपदस्थांना याआधीच केली आहे. पण वादाच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांच्याबाबत केंद्रातील उच्चपदस्थांकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याविषयी उत्सुकता आहे. राज्यपालांच्या नवी दिल्ली दौऱ्याबाबत राजभवनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नसून अद्याप कार्यक्रम व भेटीगाठींचा तपशील ठरलेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.