मुंबई : ‘स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही. इतर भाषांचा द्वेष करणे म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणे नाही. आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगे नाही. परंतु तुम्हाला विविध भाषा बोलता येणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो’, असे स्पष्ट मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात व्यक्त केले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या स्थापना दिन सोहळ्याचे शनिवार, १९ एप्रिल रोजी मुंबईतील महानगरपालिका मार्ग येथील रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूलमधील सेंट्रल हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष टी.जी. सीताराम, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नाविन्यपूर्ण अध्यापन व कामासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना पाठबळ देऊन ‘स्टार्टअप’मध्ये रुपांतर करण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातर्फे आयोजित ‘आयडिएशन’ या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी प्रास्ताविक केले.
‘हिंदी भाषा आवश्यक आहे. परंतु हिंदी भाषा मला नीट समजत नाही, ही माझी मोठी कमकुवत बाजू आहे. मला हिंदी भाषा समजली तर मी तळागाळातील गरिबांच्या भावभावना समजू शकतो. भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. परंतु अद्यापही भारतातील २० टक्के जनता गरीब आहे. त्यामुळे मी गरिबांच्या भावना समजू शकलो नाही, तर नेता होऊ शकत नाही. तुम्ही सर्वच भाषा शिकू शकत नाही, परंतु काही भाषा शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली कार्यक्षमता इतरांपेक्षा चांगली वाढू शकेल.
विद्यार्थ्यांनी विविध भाषा शिकायला हव्या. त्याचा शैक्षणिक व भविष्यात व्यावसायिक स्तरावर फायदा होईल. अनेकांना उद्योग किंवा कामानिमित्त परदेशात जावे लागते. अशा व्यक्तींना त्या देशातील भाषा अवगत असेल तर व्यवहार करणे सोपे होते. जर्मन, तसेच जापनी भाषा आली, तर तुम्ही त्या देशात व्यवस्थित राहून कार्य करू शकता. त्यामुळे ज्या देशात कामासाठी किंवा शिक्षणासाठी जाता, त्या देशातील भाषा शिकण्याचा निर्धार करायला हवा’ , असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.