नाशिक : गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट आहे. पाण्याचा दर्जा निकृष्ट असल्याने त्यात स्नान करणेही हानीकारक ठरू शकते. नद्यांचे संरक्षण न झाल्यास भविष्यात मानवी जीवन संकटात येईल, असा धोका राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. येथे श्रीरामतीर्थ गोदावरी समितीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी गोदाघाटावर गोदा आरती आणि पुरस्कार वितरण सोहळा राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रारंभी त्यांनी गंगापूजन केले. यावेळी जल व पर्यावरण तज्ज्ञ महेश शर्मा यांना गोदावरी राष्ट्र जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना राज्यपालांनी नद्यांच्या दुरावस्थेवर बोट ठेवत चिंता व्यक्त केली. गोदाकाठावर आपण उत्साहात जमलो, परंतु, नदीची अवस्था बिकट आहे. औद्योगिक वसाहती व शहरातील सांडपाणी नदीत मिसळते. ज्या नद्यांवर आपले जीवन अवलंबून आहे, त्यांचे जीवन अडचणीत येत आहे. कधीकाळी मुंबईतून पाच नद्या वाहत होत्या. त्या नष्ट होऊन आता केवळ मिठी नदी शिल्लक आहे. तिचे स्वरुपही नाल्यासारखे झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुंबई व दिल्लीसारख्या महानगरांमध्ये प्रदूषणाची समस्या चिंताजनक आहे. समाजाने नद्यांचे संरक्षण, त्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता राधाकृष्णन यांनी मांडली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांताराम भानोसे आदी उपस्थित होते.