मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या पुढाकाराने राजभवनात छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा , कर्नाटक, केरळ, पंजाब व तमिळनाडू या राज्यांचा तसेच पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन बुधवारी साजरा करण्यात आला. धर्माचे अधिष्ठान दिल्यास वेगवेगळय़ा राज्यांतील नव्या संस्कृतीची ओळख होईल, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.
राज्यपाल म्हणाले की, आद्य शंकराचार्यानी संपूर्ण देशाला समान संस्कृतीच्या धाग्याने जोडण्याच्या उद्देशाने देशाच्या वेगवेगळय़ा दिशांना चार मठांची स्थापना केली. धर्माचे अधिष्ठान दिल्यास लोक एका भागातून दुसऱ्या भागात पर्यटनाला जातील व त्यातून त्यांना नव्या संस्कृतीची ओळख होईल. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम देखील प्रत्येक राज्याने इतर राज्यांची संस्कृती जाणून घ्यावी, या हेतूने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ तेलुगू अभिनेते सुमन तलवार, चित्रोत्पला लोक कला परिषदेचे संचालक राकेश तिवारी, तेलुगू कला समितीचे एम.के. रेड्डी आणि कुचीपुडी नृत्यांगना नादिया यांचा सत्कार करण्यात आला.