मराठवाडय़ाचा दुष्काळी दौरा करणार;निधी वाढवून मिळण्याची अपेक्षा
दुष्काळाबाबत राज्यपाल गंभीर नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गेल्या वर्षी केली होती. या पाश्र्वभूमीवर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी दुष्काळाच्या प्रश्नात लक्ष घातले असून, पुढील महिन्याच्या सुरुवातीला ते मराठवाडय़ाचा दौरा करणार आहेत.
यापूर्वी २००४ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा तत्कालीन राज्यपाल मोहमद फझल यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला होता. नदीच्या कोरडय़ा पात्रात राज्यपालांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले होते. दुष्काळी परिस्थिती किती भीषण आहे हे तेव्हा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले होते. एकूणच परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच तत्कालीन राज्यपाल फझल यांनी त्यांच्या अधिकारात सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या निधी पश्चिम महाराष्ट्रासाठी वाढवून दिला होता. विशेष म्हणजे त्याचा फायदा २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला झाला होता.
या पाश्र्वभूमीवर राज्यपाल शंकरनारायणन यांच्या दौऱ्याचा काही फायदा होईल, अशी अपेक्षा मराठवाडय़ातील नेतेमंडळी करीत आहेत.
राज्यपाल ५ ते ७ मार्च या काळात मराठवाडय़ाचा दौरा करणार असल्याचे राजभवनच्या सूत्राकडून सांगण्यात आले. गेल्याच आठवडय़ात राज्यपालांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाचारण करून दुष्काळी मदतीत योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचना केली होती. आता राज्यपाल स्वत:च परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Story img Loader