मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा पुढील तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) केला जात असून प्रकरणातील दोन आरोपींनी त्याला विरोध केला आहे. मात्र खटला जलदगतीने चालवण्याचा अधिकार आरोपींना असून प्रकरणाच्या पुढील तपासाला विरोध करण्याचा नाही, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींची याचिका ऐकण्यास बुधवारी नकार दिला.
प्रकरणाचा नव्याने आणि पुढील तपास करणे या दोन वेगळय़ा बाबी असून दोन्ही प्रकरणांत आरोपींचे अधिकारही वेगळे आहेत. पानसरे हत्या खटल्याला स्थगितीही देण्यात आलेली नाही, परंतु प्रकरण पुढील तपासासाठी एटीएसकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याचा नव्याने तपास केला जाणार नाही. त्यामुळे खटला पारदर्शी पद्धतीने आणि जलदगतीने चालवण्याची मागणी करण्याचा अधिकार आरोपींना असला, तरी पुढील तपासाला विरोध करण्याचा अधिकार त्यांना नाही, असेही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.