कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या हे राज्याच्या पोलीस प्रमुखांना आव्हान असून पोलीस आणि गृहखाते काय करीत आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केला. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवून पोलिसांची जबाबदारी त्यांच्यावर ढकलू नये, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले, तर आम्ही राजकारण न करता मुख्यमंत्र्यांचा किंवा गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही; पण सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, असे विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केली. विरोधकांनी पानसरे निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यास सरकारला भाग पाडण्यात यश मिळविले आणि त्यानिमित्ताने गृहखात्यावर नेमही साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा शोक प्रस्ताव मांडला. त्या वेळी बोलताना भुजबळ यांनी पोलिसांवर टीकेची झोड उठविली. पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात विचारस्वातंत्र्यावरील हल्ला होतो याची जबाबदारी मंत्र्यांपेक्षा पोलिसप्रमुखांवर अधिक आहे. पानसरे यांच्या हत्येनंतर १७-१८ दिवस पोलिसप्रमुखांनी कोल्हापूरला जाऊन तपासाची माहितीही घेतली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करीत भुजबळ म्हणाले, हे प्रकरण सीबीआयकडे देऊन पोलिसांवरची जबाबदारी त्यांच्यावर ढकलू नये. सीबीआयकडे कामाचा व्याप आहे. त्यांच्यापेक्षा पोलीसच योग्य तपास करतील. भुजबळ यांच्या टीकेची धार वाढू लागताच, कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेत अधिक बोलता येईल, हा शोक प्रस्ताव आहे, अशी सूचना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
आमच्या सरकारच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली, तर या सरकारच्या काळात पानसरे यांची हत्या झाली, असे उल्लेख करून याप्रश्नी आम्ही राजकारण करणार नाही; पण ही हत्या आपल्या सर्वानाच शरमेची बाब असून पोलीस का कमी पडतात, याचा विचार करावा लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा