जोगेश्वरीतील गोविंदा पथकाचा निर्धार
नारळी पौर्णिमेला सराव शिबिरात दहीहंडी फोडून जमा होणारी बिदागी सावित्री नदीवरील वाहून गेलेल्या पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबाला देण्याचा संकल्प उंच दहीहंडी फोडण्याचा विक्रम साधणाऱ्या जोगेश्वरीतील गोविंदा पथकाने सोडला आहे.
दहीहंडी उत्सव जवळ आल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी रात्र जागवून उंच थर रचण्याचा सराव करण्यात तरुण मंडळी व्यस्त असतात. मात्र दहीहंडीची उंची आणि थरात सहभागी होणाऱ्या मुलांच्या वयोमर्यादेवर येणारी बंधने याबाबत स्पष्टता नसल्याने गोविंदा पथकांचा सरावाबाबतचा उत्साह मावळला होता. मात्र नारळी पौर्णिमा जवळ येताच गोविंदांमधील उत्साह सळसळू लागला असून गोविंदा पथकांनी मोठय़ा उत्साहात चोर गोविंदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे महाड दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या प्रशांत माने यांच्या कुटुंबीयाला मदत करण्यासाठी गोविंदा सरसावले आहेत.
पोलादपूरजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला आणि त्यात जोगेश्वरीमधील प्रशांत माने यांचा मृत्यू झाला. प्रशांत माने यांच्या कुटुंबाला अर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने यंग उमरखाडी क्रीडा मंडळ आणि यंग उमरखाडी गोविंदा पथकाने दहीहंडी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. उंच दहीहंडी फोडण्याचा विक्रम करणाऱ्या जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथक यंदा प्रथमच नारळी पौर्णिमेनिमित्त ‘चोर गोविंदा’ काढणार आहे. उमरखाडीमधील दहीहंडी फोडून माने कुटुंबीयांना मदत करण्यासाठी मंडळ सरसावले आहे. याच दिवशी अन्य काही ठिकाणी दहीहंडी फोडून मिळणारी बिदागी माने कुटुंबाला देऊ, असे या मंडळाचे महेश सावंत यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा