दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देताना राज्य सरकारने थरांच्या उंचीचा मुद्दा गुलदस्त्यातच ठेवल्यामुळे गोविंदा पथकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दहीहंडीबाबतच्या धोरणात स्पष्टता नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा चौकात सरकारच्या निषेधार्थ सात थर रचून आंदोलन करण्यावर गोविंदा पथके ठाम आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सचिवांवर नोटीस बजावल्यामुळे तमाम गोविंदा संतप्त झाले आहेत. परिणामी, येत्या १५ ऑगस्ट रोजी गोविंदा आणि पोलीस आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.
दहीहंडी समन्वय समितीने स्वातंत्र्यदिनी हुतात्मा चौकात निषेधाचे थर रचून आंदोलन करण्याचा इशारा देताच राज्य सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. मात्र दहीहंडी किती उंचावर असेल, किती थर रचण्यास परवानगी असेल, आयोजकांवर कोणते र्निबध घालण्यात येणार आदींबाबत कोणतेच सूतोवाच सरकारकडून करण्यात आले नाही. त्यामुळे गोविंदा पथके गोंधळली आहेत. दहीहंडी उत्सवाचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन करणाऱ्या एका आयोजकाच्या सूचनेनुसार बुधवारी रात्री उशिरा ठाणे येथे गोविंदा पथकांची गुप्त बैठक पार पडली. सरकारने उत्सवाबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच येत्या १५ ऑगस्ट रोजी हुतात्मा चौकामध्ये सात थर रचून सरकारचा निषेध करण्याचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला.दहीहंडी समन्वय समितीने हुतात्मा चौकात आंदोलन करण्याचा इशारा देताच समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर आणि सचिव कमलेश भोईर या दोघांवर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. हुतात्मा चौक परिसरात १५ ऑगस्ट रोजी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानामध्ये आंदोलन करता येईल. मात्र हुतात्मा चौकात आंदोलन करता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्याला अटक करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे. मात्र नोटीस मिळाल्यानंतरही दहीहंडी समन्वय समिती आंदोलन करण्यावर ठाम आहे. त्यामुळे येत्या शनिवारी गोविंदा पथके आणि पोलीस आमनेसामने येण्याची चिन्हे असून वाद चिघळण्याची शक्यता आहे.
गोविंदा पथके-पोलीस आमनेसामने
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देताना राज्य सरकारने थरांच्या उंचीचा मुद्दा गुलदस्त्यातच ठेवल्यामुळे गोविंदा पथकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
First published on: 14-08-2015 at 02:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda group to protest against maharashtra government policy