उन्हाचा पारा आणि घामाच्या धारा लागल्याने गोविंदा पथके बेजार झाली होती. थर रचताना असह्य उकाडय़ाचे नवे संकट गोविंदांना सतावत होते. कडक उन्हाच्या तडाख्यात कमालीचा थकवा आल्यामुळे दुपारनंतर अनेक तरुणांनी गोविंदा पथकातून काढता पाय घेतल्याचे दिसून येत होते.
दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाण्याविना पूर्ण होतच नाही. मोठय़ा दहीहंडी उत्सवाचे आयोजक गोविंदा पथकांना नखशिखांत भिजवून टाकण्यासाठी खास टँकर मागवून त्यांच्यावर पाण्याचे फवारे उडवितात. तर ठिकठिकाणी इमारतीच्या सज्जा, खिडकीतून उताणी होओतल्या जाणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटत गोविंदा पथके फिरायची…
पण यंदा निम्म्या महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचे भान राखून मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळला आणि उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या गोविंदांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. उकाडय़ामुळे थकवा येऊ लागल्याने अनेक तरुणांनी तर थेट घर गाठणे पसंत केले.
पावसाने मारलेली दांडी आणि पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी महापलिकांनी घेतलेली कठोर भूमिका यामुळे गोविंदामधील जोष हरवल्याचे चित्र दिसत होते. ठाण्यात उन्हाच्या कडाक्यामुळे थकलेल्या गोविदांनी थेट मुंबई-नाशिक महामार्गाला लागून महापालिकेने निर्माण केलेल्या हरितपथाचा आसरा घेतला. या पथावरील हिरवळीवर विश्रांती घेणारे गोविंदा दिसत होते. पाण्यामुळे थकवा येत नाही, मात्र यंदा पाऊसही नाही आणि दहीहंडीच्या ठिकाणीही पाणी नसल्यामुळे प्रचंड थकवा येत असल्याची तक्रार काही गोविंदा करीत होते.

Story img Loader