आवाजाचा दणदणाट, थरांचा थरथराट आणि बालगोविंदांचा सहभाग यांमुळे यंदा अधिक चर्चेत राहिलेला दहीहंडी उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांसाठी रान मोकळे झाले आहे. मात्र,  अनेक ठिकाणी आयोजकांनी गोविंदाच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्यामुळे यंदा दहीहंडी उत्सवाला दु:खद घटनांचे गालबोट लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पूर्वसंध्येला, रविवारी मुंबई-ठाण्यात गोविंदा पथकांनी कसून सराव केला. तर दुसरीकडे, अनेक मोठय़ा दहीहंडी उत्सवांच्या ठिकाणी गोविंदांच्या सुरक्षेविषयी खबरदारी घेतली जात असल्याचे चित्र होते. विलेपार्ले (पूर्व) येथील भोगले चौकात उभारण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवादरम्यान जमिनीवर गाद्या अंथरण्यात येतील, असे आयोजक व आमदार कृष्णा हेगडे यांनी सांगितले. सर्वात वरच्या थरावरील गोविंदाच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट पुरवले जाणार असून या ठिकाणी मदतीसाठी दोन क्रेनही ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे येथे सात थरांची हंडी असेल, असेही हेगडे यांनी म्हटले आहे. ठाण्यातील टेंभीनाका परिसरात शिवसेनेतर्फे आयोजित उत्सवातही सात थरांचीच हंडी असेल, असे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले.

संबंधीत बातम्या;
डझनाहून अधिक सिनेतारकांच्या साक्षीने कोटय़वधींचा चुराडा  
दहीहंडीच्या जल्लोषासाठी शिवसेना नेते सज्ज
दहीहंडीवरील र्निबध योग्यच – राज ठाकरे 
दहीहंडी फोडल्यानंतर रोख रक्कम, सोन्याची नाणी घेऊ नका!
ठाण्यात मात्र दहा थरांसाठी २५ लाखांचे आमिष 
दादरमध्ये कलावंतांची प्रदूषणविरहीत दहीहंडी

आव्हाडांचा ‘दहा थरांचा गोविंदा’
वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेतर्फे ठाण्यातील पाचपाखाडी येथे मात्र गोविंदा पथकांना नऊ-दहा थरांचे आमिष दाखवण्यात आले आहे. दहा थर लावणाऱ्यांस २५ लाख तर नऊ थर लावणाऱ्यांस २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी साधने पुरवण्यात येतील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
ठाण्यात पोलिसांची विशेष पथके
सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पोलीस उपायुक्तांच्या पातळीवरही विशेष पथक तयार केल्याचे ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.
डॉक्टरांसह पाच रुग्णवाहिका सज्ज
जखमी गोविंदांवर प्रथमोपचार करण्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून डॉक्टरांसह पाच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिका लालबाग, भायखळा, परळ, वरळी, दादर येथे तैनात करण्यात येणार आहेत. मदतीसाठी ९२२४२४५७०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन न्यासाने केले आहे.

काही महत्त्वाच्या हंडय़ा : आमदार राम कदम यांची हंडी (घाटकोपर) कृष्णा हेगडे प्रतिष्ठान (विलेपार्ले), संजय निरुपम (बोरिवली), बाळा नांदगावकर (काळाचौकी), सचिन अहिर (संकल्प प्रतिष्ठान, वरळी), जितेंद्र आव्हाड (संघर्ष, पाचपाखाडी), खासदार राजन विचारे (चरई, ठाणे), रवींद्र फाटक (संकल्प प्रतिष्ठान, रघुनाथ नगर, ठाणे).