आवाजाचा दणदणाट, थरांचा थरथराट आणि बालगोविंदांचा सहभाग यांमुळे यंदा अधिक चर्चेत राहिलेला दहीहंडी उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांसाठी रान मोकळे झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी आयोजकांनी गोविंदाच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्यामुळे यंदा दहीहंडी उत्सवाला दु:खद घटनांचे गालबोट लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पूर्वसंध्येला, रविवारी मुंबई-ठाण्यात गोविंदा पथकांनी कसून सराव केला. तर दुसरीकडे, अनेक मोठय़ा दहीहंडी उत्सवांच्या ठिकाणी गोविंदांच्या सुरक्षेविषयी खबरदारी घेतली जात असल्याचे चित्र होते. विलेपार्ले (पूर्व) येथील भोगले चौकात उभारण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवादरम्यान जमिनीवर गाद्या अंथरण्यात येतील, असे आयोजक व आमदार कृष्णा हेगडे यांनी सांगितले. सर्वात वरच्या थरावरील गोविंदाच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट पुरवले जाणार असून या ठिकाणी मदतीसाठी दोन क्रेनही ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे येथे सात थरांची हंडी असेल, असेही हेगडे यांनी म्हटले आहे. ठाण्यातील टेंभीनाका परिसरात शिवसेनेतर्फे आयोजित उत्सवातही सात थरांचीच हंडी असेल, असे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा