राज्य सरकारने घातलेले र्निबध मागे घ्यावेत या मागणीसाठी आता दहीहंडी पथके रस्त्यावर उतरू लागली आहेत. रस्त्यात नियमानुसार थर रचून नागरिकांचे आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न गोविंदा पथकांनी सुरू केला आहे. दहीहंडी उत्सवाची परंपरा कायम राहावी यासाठी पथकांनी स्वाक्षरी आणि संपर्क मोहिमही हाती घेतली आहे.
राज्य सरकारने कडक र्निबध लादल्यामुळे आयोजकांनी दहीहंडी उत्सवातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. आयोजकांच्या जीवावर आर्थिक गणित अवलंबून असलेल्या गोविंदा पथकांची त्यामुळे पंचाईत झाली आहे. परिणामी, मुंबईमधील मोठे गोविंदा पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकाने पूर्वीप्रमाणे उत्सव साजरा करता यावा यासाठी रस्त्यावर उतरून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकाबाहेर प्रत्येक नागरिकाशी संपर्क साधून दहीहंडी उत्सव वाचविणे कसे गरजेचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न पथकातील गोविंदा करीत होते. तसेच रेल्वे स्थानकाबाहेर पाच थर रचून सरकारच्या धोरणाचा या पथकाने निषेधही केला. सायंकाळी ५.३० ते रात्री ९ या वेळेत तब्बल ३,५२० जणांनी स्वाक्षरी करून सरकारने लादलेल्या अटींचा निषेध केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा