मुंबईतल्या खार येथील चैताली माळी गेल्या पाच वर्षांपासून तेथील स्थानिक गोविंदा पथकाच्या सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडत आहे. यंदा न्यायालयाच्या निर्बंधानुसार १२ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडी पथकात सामील होण्यास बंदी घालण्यात आली होती पण, चैताली त्यातही भाग्यवान ठरली कारण, नेमके सोमवारी दहीहंडी दिवशी चैतालीचा १२वा वाढदिवस होता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून खार येथील ओम काचरनाथ मंडळाच्या दहीहंडी पथकातील एकमेव महिला गोविंदा चैताली माळी या गोविंदाला यंदाही सर्वात वरच्या थरावर चढून हंडी फोडली.
सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दहीहंडीच्या आकाराचा केक कापून चैताली माळीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तिचे वडील सुनील माळी यांनी गेल्या पाच वर्षांपासून माझी मुलगी दहीहंडी फोडत आहे आणि त्यासाठी दरवर्षी महिनाभर ती सराव देखील करते. यावेळी नेमक्या दहीहंडी दिवशीच तिचा वाढदिवस आला आणि १२ वर्षांच्या न्यायालयाच्या दहीहंडी बाबतच्या बंधनातूनही ती मुक्त झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दहीहंडीच्या थरांवर चढण्यातून मला आनंद मिळतो आणि मी पडते तेव्हा पथकातील गोविंदांनी मला प्रत्येकवेळी सावरले असल्याचे चैतालीने म्हटले आहे. वाढदिवशी भरपूर नवे-नवे कपडे भेट म्हणून मिळाले आहेत पण, दहीहंडी दिवशी पथकाचे गडद पिवळ्या रंगाचे टी-शर्ट घालावे लागल्याने नवे कापडे वापरणे अजून बाकी असल्याचेही चैतालीने प्रांजळतेने म्हटले.

Story img Loader