बस कुठवर आली, किती आसने शिल्लक ही माहिती सर्व स्थानकांत तात्काळ
आपण ज्या गावी जाऊ इच्छिता तिकडे जाणारी एसटी तुम्ही ताटकळत असलेल्या स्थानकात किती वेळेत येणार आहे, सध्या ती कोणत्या स्थानकापर्यंत पोहोचली आहे, गाडीत किती आसने शिल्लक आहेत, ही सर्व माहिती आता प्रत्येक स्थानकातील पडद्यावर झळकणार असल्याने एसटी प्रवासात प्रतीक्षेत वाया जाणारा प्रवाशांचावेळ वाचणार आहे. त्यासाठी प्रत्येक गाडीत जीपीएस यंत्रणा बसविली जात असून या योजनेचा प्रारंभ सातारा स्थानकापासून होणार आहे.
सुरुवातीला सातारा बस स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबवण्यात येणार असून लवकरच याबाबची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे एसटी गाडय़ांची ही संपूर्ण माहिती भ्रमणध्वनीवरही उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा विचार असल्याने येत्या काळात एसटीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटीची राज्यभरात एकूण ५८८ बस स्थानके आणि २५२ बस आगार आहेत. यातून प्रतिदिन १८ हजारांहून अधिक बस गाडय़ा चालवल्या जात असून या गाडय़ांनी रोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र अनेकदा अमुक एक गाडी किती वेळात येणार, याची माहिती मिळत नसल्याने प्रवाशांना बस स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागते. परंतु येत्या काळात प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे.
बस गाडी कोणत्या मार्गावर धावणार आहे, बस गाडीचा क्रमांक, थांबे, आगमन-निर्गमनाची वेळ, प्रवास करत असलेल्या प्रवाशांची संख्या, शिल्लक आसनांची संख्या थेट बस स्थानकावरील पडद्यावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. तसेच लांबचा प्रवास करून येणाऱ्या आप्तांना बस स्थानकांवर घ्यायला येणाऱ्यांनाही वेळेचे नियोजन करता येणार आहे.
यासाठी ‘वाहन ट्रॅकिंग प्रणाली’ आणि ‘प्रवासी माहिती प्रणाली’ बसवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकाने चुकीच्या मार्गावरून बस गाडी चालविल्यास नियंत्रण कक्षात त्याची माहिती उपलब्ध होणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अनेकदा गाडीत जागा असूनही जागा नसल्याचे काही वाहक सांगतात, अशा तक्रारी आहेत. त्याही आता उरणार नाहीत.
एसटीत उद्घोषणा यंत्रणाही!
मेट्रो आणि रेल्वे पाठोपाठ एसटीच्या बस गाडय़ांतही पुढील स्थानकाची माहिती देणारी उद्घोषणा यंत्रणा बसवली जाणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल, असे एसटीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gps system set in st bus
Show comments