प्रसाद रावकर

पालिका प्रशासनाचे परिपत्रक जारी

मुंबई : कोणत्याही राज्यांतील मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ वा संस्थेमधून दहावी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वेतनबंध (पे बॅण्ड) आणि श्रेणी वेतन (ग्रेड पे) मिळण्याचा मार्ग प्रशासनाने परिपत्रक जारी करीत मोकळा केला आहे. यापूर्वी काही मोजक्या शिक्षण मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगारांना हा लाभ मिळत होता.

मुंबई महापालिकेचे चतुर्थश्रेणी कामगारांची फौज मोठी आहे. मुंबई स्वच्छ करणारे सफाई कामगार, विविध खात्यांमधील कामगार, कक्ष परिचर (वॉर्ड बॉय), आयाबाई, मुकादम आदींचा त्यात समावेश आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता पदानुसार चौथी, सातवी, तर नववी अशी आहे. पालिकेच्या सेवेत १ सप्टेंबर २०११ नंतर रुजू झालेला चतुर्थश्रेणी कर्मचारी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्याला ५२०० रुपये ते २०,२०० रुपये वेतनबंध आणि १८०० रुपयांपर्यंत श्रेणीवेतन देण्याची अट प्रशासनाने २०११ रोजी सहाव्या वेतन आयोगानुसार केलेल्या वेतन करारात समाविष्ट केली होती. ही अट मान्य करीत काही कर्मचारी संघटनांनी या वेतन करारावर स्वाक्षरी केली. चतुर्थश्रेणी कर्मचारी शिक्षित व्हावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता.

वेतन करारातील अटीनुसार वेतनबंध आणि श्रेणीवेतन पदरात पाडून घेण्यासाठी चतुर्थश्रेणीतील अनेक कर्मचाऱ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यात अनेक जण उत्तीर्ण झाले. बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी अन्य राज्यांतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून गुणपत्रिका पालिका दरबारी सादर केली. बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी परराज्यातील संस्थांमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे गुणपत्रिकांवरून स्पष्ट झाले. या प्रकारामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला. अखेर प्रशासनाने केवळ राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा, सीबीएसई, आयसीएसई संस्थेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वेतनबंध आणि श्रेणीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय घेत नवे परिपत्रक काढले. नव्या परिपत्रामुळे अन्य राज्यातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची मेहनत वाया गेली. अखेर म्युनिसिपल मजदूर युनियनने याविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अन्य राज्यांतील सरकारमान्य शैक्षणिक मंडळे, संस्थांमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा लाभ देण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने नवे परिपत्रक प्रसिद्ध करून राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा, सीबीएसई, आयसीएसई संस्थेसोबतच अन्य राज्यांतील सरकारमान्य शैक्षणिक मंडळ, संस्थांमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वरील सुविधेचा लाभ देण्यात येतील असे सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader