आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपबरोबर राहूनच लढविण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार कायम असला तरी, सर्व समाजातून पाठिंबा मिळण्यासाठी खास करून आंबेडकरी समाजाची मते मिळविण्यासाठी महायुतीने किमान समान कार्यक्रम तयार करावा आणि त्यात हिंदूत्व वा इतर वादग्रस्त मुद्दे असू नयेत, असा आग्रह आरपीआय धरणार आहे. रिपब्लिकन पक्षाने घेतलेल्या नव्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत असताना आंबेडकरी विचारवंतही हिंदुत्वाच्या मुद्यावर अडखळत आहेत. सत्ता मिळवायची असेल तर सर्वसमावेशक धोरण घ्यावे लागेल, अशी भूमिका महायुतीच्या आगामी बैठकात मांडण्याची आरपीआयने तयारी केली आहे.
रिपब्लिकन पक्षाने शिवसेना-भाजपबरोबर युती का केली आणि त्याचे काय परिणाम होतील, या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यात पुणे, महाबळेश्वर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, वसई, अहमदनगर इत्यादी ठिकाणी कार्यकर्त्यांची शिबिरे घेण्यात आली. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या शिबिरांमध्ये आंबेडकरी विचारवंतांनाही खास बोलावले गेले होते. त्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानवतावणे, डॉ. कृष्णा किरवले, प्रा. पी. जे. जोगदंड, अॅड. दिलीप काकडे, ऋषिकेश कांबळे, प्राचार्य कमलाकर कांबळे, ई.झेड खोब्रागडे, मोतिराम कटारे, आदी लेखक, कवी, विचारवंत यांचा समावेश होता.  या शिबिरांमधून शिवसेना-भाजपपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे जातीयवादी पक्ष आहेत, त्यांनी आतापर्यंत फक्त आरपीआयला वापरून घेतले म्हणून त्यांचा पराभव करण्यासाठी सेना-भाजपशी हात मिळवणी करणे आवश्यक आहे, अशी मांडणी केली जाते. तसेच यापूर्वी शिवसेनेशी काँग्रेसने, समाजवादी पक्षाने युती केलेली होती, असा प्रचार कार्यकर्त्यांकडून केला जात आह़े

Story img Loader