मुंबई : राज्याचे भव्य सांस्कृतिक केंद्र व वस्तुसंग्रहालय मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. याचे संवर्धन करणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
राज्य वस्तुसंग्रहालयामार्फत प्राचीन भारतीय वारशाचे जतन करून पुढील पिढ्यांना ते दाखविण्याचे महत्त्वाचे काम आहे. विविध उत्खनने आणि शोध कार्यक्रमातून उजेडात आलेल्या कलाकृती, महत्त्वाचा ऐतिहासिक वास्तू, शस्त्रे आणि विणकाम, कपडे आणि पोशाख आणि कलावस्तू कलाकृती, शिलालेख, ताम्रपट, प्राचीन मध्ययुगीन रचनात्मक अवशेष आणि थोर कलाकाराच्या दुर्मीळ चित्रकृती जतन करणे साध्य होईल. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेची मांडणी एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक भवनाची आणि राज्य वस्तुसंग्रहालयाची राज्याच्या राजधानीत आवश्यकता आहे. त्यानुषंगाने, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील १४,४१८ चौरस मीटरचा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्य विभागास विनामूल्य हस्तांतरित करण्यात येईल, असे शेलार यांनी नमूद केले.
स्वरूप कसे?
राज्य सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य सभागृह, कला दालने व संशोधन केंद्र आदी गोष्टी असतील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी राज्य सांस्कृतिक केंद्र हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारंसाठी एक व्यासपीठ म्हणून हे केंद्र कार्यरत राहील, असे शेलार यांनी सांगितले.