लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ‘ॲड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ’ एज्युकेशन वर्ल्ड इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग्स अवॉर्ड्स २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट नेतृत्व” या श्रेणीत प्रतिष्ठित ग्रँड ज्यूरी पुरस्कार प्राप्त केला आहे. हा पुरस्कार पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा ॲड. अंजली हेळेकर व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. वैशाली गुरव यांनी स्वीकारला. हा समारंभ वसंत कुंज, नवी दिल्ली येथे शुक्रवार पार पडला. पुरस्कार प्रदान करताना प्राईस वॉटरहाऊस कूपरचे भागीदार विवेक शुक्ला आणि डिझाईन, क्रिएटिव्हिटी अँड मिडिया विभागाचे संचालक सुचेंद्र कुमार उपस्थित होते.
एज्युकेशन वर्ल्ड हे आशियामधील शिक्षण विषयक सर्वात लोकप्रिय मासिक असून १९९९ पासून कार्यरत आहे. शिक्षणाला राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी जनमताची ताकद उभारणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. २०१९ पासून एज्युकेशन वर्ल्डने भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या गौरवासाठी ग्रँड ज्यूरी रँकिंग्सची सुरुवात केली आहे. २०१२ साली स्थापन झालेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ॲड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉने अल्पावधीतच मुंबईतील एक प्रमुख विधी महाविद्यालय म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. महाविद्यालयात बी.ए.एलएल.बी. (५ वर्षांचा अभ्यासक्रम), जनरल एलएल.बी. (३ वर्षांचा अभ्यासक्रम) आणि नव्याने सुरु करण्यात आलेला व्यवसायिक कायदे व फौजदारी कायदे यामधील एलएल.एम. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीवरील सुवर्णपदकांसह विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सुराणा अँड सुराणा, नानी पालखीवाला मेमोरियल ट्रस्ट, हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडिशा, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी गुजरात आणि अमिटी युनिव्हर्सिटी यांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मानाची पारितोषिके मिळवली आहेत.महाविद्यालयाचा उद्देश सक्षम वकील, न्यायाधीश आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्व घडविणे आहे, जे समाजाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करतील. एज्युकेशन वर्ल्डचा हा पुरस्कार महाविद्यालयाच्या या प्रवासाला आणखी बळकटी देणारा आहे.