मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादन पट्ट्यात द्राक्ष उत्पादनात सरासरी ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. निर्यातीसह देशांतर्गत बाजारातही द्राक्षांना चांगला दर मिळत असल्यामुळे बेदाणा निर्मितीसाठी द्राक्षांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी यंदा बेदाणा उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होऊन उत्पादन १ लाख ९० हजार टनांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.

राज्यात सांगली, सोलापूर, नाशिक आणि कर्नाटक सीमाभागात बेदाणा उत्पादन होते. द्राक्षांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे द्राक्ष क्षेत्रात गत दोन वर्षांत ५० हजार एकरने घट झाली आहे. शिवाय अवकाळी पाऊस, अति उष्णता आदी कारणांमुळे यंदा द्राक्ष उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. क्षेत्र आणि उत्पादनात झालेल्या घटीमुळे देशांतर्गत बाजारात द्राक्षांना आजपर्यंत चांगला दर मिळतो आहे. सध्या शेतकऱ्यांना किरकोळ बाजारातील विक्रीसाठी द्राक्षांना चार किलोच्या पेटीसाठी २१० ते २६० रुपयांचा तर बेदाण्यासाठीच्या द्राक्षांना द्राक्षाला १६० ते १८० दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी किरकोळ बाजारात द्राक्ष विक्रीला प्राधान्य देत आहेत.

दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो. फेब्रुवारीपासून हंगामाला गती येते. एप्रिल महिन्याअखेर बेदाणा निर्मिती सुरू राहते. मात्र, यंदा द्राक्षाची टंचाई असल्यामुळे मार्चअखेर हंगाम संपण्याची स्थिती आहे. बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. पण, बेदाणा शेडवर बेदाणा निर्मितीसाठी पुरेशा द्राक्षांची उपलब्धता दिसून येत नाही. द्राक्षांअभावी बेदाणा शेड रिकामी पडून आहेत. यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम अवघ्या दोन महिन्यांतच संपणार असल्याची चिन्हे आहेत.

गेल्यावर्षी राज्यात २ लाख ४७ हजार टन बेदाणा उत्पादन झाले होते. यंदा ४० टक्क्यांनी घट होऊन १ लाख ९० हजार टनांपर्यंत बेदाणा उत्पादन खाली येण्याची शक्यता आहे. बेदाणा उत्पादनात घट झाल्यामुळे सांगली, तासगाव आणि सोलापुरातील बेदाणा बाजारात २५० ते ३०० रुपये किलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी माहिती सांगली येथील बेदाणा व्यापारी राजेंद्र कुभार यांनी दिली.

राज्यातील बेदाणा उत्पादन

वर्ष उत्पादन (टनांत)

२०१८ – १९…१.७० लाख

२०१९ – २०…१.८० लाख

२०२१ – २२…२.५७ लाख

२०२२ – २३…२.७२ लाख

२०२३ – २४…२.४६ लाख

२०२४- २५… १.९० लाख (अंदाजे)

(संदर्भ – तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)

बेदाणा उत्पादन निम्यावर आले

दरवर्षी आमच्या बेदाणा शेडवर ६० टन बेदाणा उत्पादन होते. यंदा ३५ टनांपर्यंतच उत्पादन होईल. बेदाण्यासाठी सरासरी ६० दिवस द्राक्षांची आवक होते, यंदा ३५ दिवसांतच द्राक्षे संपली आहेत. हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाण्यासाठी द्राक्षांचा तुटवडा जाणवत आहे. द्राक्षांअभावी बेदाणा निर्मिती व्यवसाय अडचणीत आला आहे, अशी माहिती तासगाव येथील बेदाणा उत्पादक प्रशांत जाधव यांनी दिली.

Story img Loader