ठाणे जिल्ह्य़ातील रीयल इस्टेटच्या क्षेत्रात सर्वात ‘हॉट डेस्टिनेशन’ असणाऱ्या ठाण्यात अधिकृत घरांच्या किमती कायमच चढय़ा राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावठाणांमधील अनधिकृत वस्त्यांमधील घरांचा आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. येथे चाळींमध्ये सदनिकांच्या तुलनेत निम्म्या किमतीत घर मिळते. त्यामुळे घरांचे हे ‘ग्रे मार्केट’ कायम तेजीत असते. ही घरे कागदोपत्री अनधिकृत असली, तरी त्यांच्यापैकी बहुतेकांकडे ८० च्या दशकातील करपावत्या असल्याने ही बांधकामे कारवाईच्या कक्षेबाहेर आहेत.
१९८२ च्या ऑक्टोबर महिन्यात स्थापन झालेल्या ठाणे महापालिकेने मध्य रेल्वेवरील दिवा-दातिवली ते घोडबंदर किल्ल्याच्या वेशीपर्यंतचा प्रदेश आपल्या कक्षेत घेतला आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पलीकडे येऊरच्या डोंगरापर्यंत तसेच घोडबंदर रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठय़ा वसाहती उभ्या राहू लागल्या. या सुनियोजित वसाहतींच्या जोडीनेच, किंबहुना त्याआधीपासूनच घोडबंदर रोड परिसरात मानपाडा, वाघबीळ, कासारवडवली, ओवळा आदी ठिकाणी, तर पूर्व द्रुतगती महामार्गापलीकडे अगदी डोंगरांवर ठाणे शहर जाऊन वसले आहे. त्यातील काही वसाहती १९७० पासूनच्या आहेत. मूळ गावठाण, गुरचरण, शासकीय भूखंड, वन तसेच खासगी जमिनींवर या वसाहती उभ्या आहेत. दुसरीकडे सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत घरे उपलब्ध करून देण्यात शासकीय यंत्रणांना अपयश आले. त्यामुळे मुंबईलगत असणाऱ्या ठाण्यात अनधिकृत वस्त्या वाढल्या. अजूनही ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे.
वागळे इस्टेट, किसननगर, लोकमान्यनगर या परिसरांत दाटीवाटीने बहुमजली इमारती उभ्या आहेत. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेनंतर अशा इमारतींमध्ये राहणे किती जोखमीचे ठरू शकते, हे दिसून आले. पारसिकच्या डोंगरावरही हजारो लोकांनी घरोबा केलेला आहे. कायद्याच्या कक्षेबाहेर असणाऱ्या या वस्त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच खाडी या पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील प्रदेशांमध्येही बिनदिक्कतपणे अतिक्रमण केले आहे.
दिव्यातील अनधिकृत बांधकामांची वात पेटतीच
रेल्वे स्थानकामुळे महापालिकेच्या वेशीवरील दिवा आणि दातिवली या गावांचे झपाटय़ाने नागरीकरण झाले. स्थानिक भूमाफियांनी तिवरांचे जंगल हटवले आणि तेथे चाळी बांधून कोटय़वधी रुपये मिळविले. पर्यावरणाशी अशा प्रकारे खेळ केल्यामुळे २६ जुलै २००५ च्या जलप्रलयात झालेला हाहाकार दिवावासीयांनी चांगलाच अनुभवला आहे. तरीही दिव्याची लोकवस्ती वाढतच आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने अनेकदा येथील बांधकामांवर कारवाया केल्या तरीही येथील अनधिकृत बांधकामांची वात पेटतीच आहे.
घरांचे ‘ग्रे मार्केट’ नेहमीच तेजीत..!
ठाणे जिल्ह्य़ातील रीयल इस्टेटच्या क्षेत्रात सर्वात ‘हॉट डेस्टिनेशन’ असणाऱ्या ठाण्यात अधिकृत घरांच्या किमती कायमच चढय़ा राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावठाणांमधील अनधिकृत वस्त्यांमधील घरांचा आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे.
First published on: 15-04-2013 at 04:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gray market always in bloom of houses